पुण्यात एमआयटीच्या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मिळालेल्या माहितीनुसार एमआयटी महाविद्यालयाचे राहुल कराड यांचा आज वाढदिवस होता. त्यानिमित्ताने गोड जेवण ठेवण्यात आले होते. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.

पुणे : लोणी काळभोर येथील विश्‍वशांती गुरूकुल एमआयटी शैक्षणिक संकुलातील एका विभागात शिक्षण घेणारे व एमआयटीच्याच वसतिगृहामध्ये राहणाऱ्या साठ ते सत्तर विद्यार्थ्यांना मंगळवारी विषबाधा झाली. त्यापैकी तीन ते चार जणांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. ही घटना कळता महाविद्यालयामध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाब याचा त्रास झाला असून कोणताही गंभीर प्रकार नसल्याचे महाविद्यालयाकडून रात्री उशीरा सांगण्यात आले. 

लोणी काळभोर येथे एमआयटीचे शैक्षिणक संकुल आहे. तसेच एक हजार विद्यार्थ्यांचे वसतीगृहदेखील आहे. या संकुलामध्ये शिपिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या मॅनेट विभाग आहे. या विषबाधा झालेले सर्व विद्यार्थी हे या विभागातील आहेत. वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोयदेखील महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आहे. नेहमीप्रमाणे आज दुपारी विद्यार्थी जेवणासाठी गेले. जेवणामध्ये गुलाबजाम देण्यात आले होते. सायंकाळी पाचनंतर अचानक दहा विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ लागला. त्यांना जुलाब आणि उलट्या होऊ लागल्याने त्यांनी कॅम्पसमधील विश्‍वराज रुग्णालयामध्ये जाऊन त्रास होत असल्याची माहिती दिली. त्यांच्यावर उपचार सुरू असताना हळूहळू अशाच त्रास होत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. सायंकाळी उशीरापर्यत ही संख्या जवळपास साठ ते सत्तर विद्यार्थ्यांवर गेली. महाविद्यालयात हा प्रकार कळताच घबराटीचे वातावरण पसरले. 

उपचारादरम्यान सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा त्रास होऊ लागल्याने विषबाधेची लक्षण असल्याचे डॉक्‍टरांच्या निदर्शनास आले. त्यांनतर डॉक्‍टारांनी तत्काळ उचाराला सुरवात केली. रात्री उशीरापर्यंत विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती. दरम्यान डॉक्‍टरांकडून उपचार करून विद्यार्थ्यांना सोडण्यात येत होते. यापैकी तीन ते चार विद्यार्थ्यांना अतिदक्षता विभागामध्ये हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. 

Web Title: Food poisoning MIT students in Pune