सांगा, आम्ही चालायचं कोठून?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

पौड रस्ता - रस्ता वाहनांसाठी तर पदपथ नागरिकांसाठी असतो हे सर्वमान्य सूत्र कोथरूडच्या मुख्य रस्त्यांवर हरवलेले दिसते. पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील पदपथावर किरकोळ व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमणे केल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी मार्ग उरलेला नाही. मेट्रोच्या कामामुळे रस्ता वाहतुकीसाठी अरुंद झाला आहे. परिणामी, नागरिकांना चालण्यास जागा उरली नसून आम्ही चालायचे कोठून, असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत. 

पौड रस्त्याचे सायकल मार्ग, पदपथ आणि रस्ता असे विभाजन करण्यात आले होते; मात्र सध्या अतिक्रमणांमुळे सायकल मार्गदेखील सायकलचालकांना वापरता येत नाही. अनेक हॉटेल, व्यावसायिकांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने ग्राहक रस्त्यावर किंवा पदपथावर वाहने लावतात. जय भवानीनगर येथे भंगार व्यावसायिकाने पदपथावर भंगार आणि त्याचा टेंपो लावून रस्ता बंद केला आहे. याबाबत कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त जयंत भोसेकर म्हणाले, की संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. पदपथावर वाहने लावणाऱ्यांवर कारवाई करावी म्हणून वाहतूक पोलिसांना पत्र देण्यात येईल.

कोथरूड डेपो परिसरात आता मेट्रोसाठी पत्रे लावले आहेत. हे पत्रे लावताना या भागातील पदपथ नागरिकांसाठी चालण्यायोग्य राहतील याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. हॉटेल किंवा व्यावसायिकांनी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी. पार्किंगच्या जागेतील अनधिकृत व्यवसाय बंद करावेत, यासाठी महापालिकेने मोहीम राबवावी. सर्वसामान्य जनतेच्या गरजांचा विचार करून विकासकामांचे नियोजन केले जावे. 
- सुहास उभे

पदपथांची जबाबदारी कोणाकडे आहे, हे शासनाने एकदा स्पष्ट करावे. नवीन बांधलेले पदपथ लगेच कसे खराब होतात? पदपथावर एवढे गवत वाढते. पदपथ स्वच्छ व चालणाऱ्यांसाठी मोकळे राहतील याची जबाबदारी महापालिकेची नाही का?
- कुणाल वेडेपाटील

पादचाऱ्यांचा विचार करणारे प्रशासन नसणे हे आपले मोठे दुर्दैव आहे. आपले सरकार आणि अधिकारी फक्त हवेत असणाऱ्यांचाच विचार करतात. मेट्रो मार्गावर काही ठिकाणी पदपथच उपलब्ध नाही. काही वाहनचालक विरुद्ध दिशेने येतात, त्या वेळी चालणाऱ्यांचे काय हाल होतात, हे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही काय?
- विजय डाकले

Web Title: Footpath issue