परदेशी विद्यार्थ्यांचा भारताकडे ओढा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 नोव्हेंबर 2018

पुणे - अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी परदेशात जात असले, तरी भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. भारतातील शिक्षण पद्धती, अन्य देशांच्या तुलनेत माफक शुल्कात होणारे शिक्षण आणि विविध क्षेत्रातील शिक्षणाच्या उपलब्ध होणाऱ्या संधी, यामुळे हे विद्यार्थी शिक्षणासाठी भारतातील विद्यापीठांची निवड करत असल्याचे दिसून येते.

पुणे - अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी परदेशात जात असले, तरी भारतात शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. भारतातील शिक्षण पद्धती, अन्य देशांच्या तुलनेत माफक शुल्कात होणारे शिक्षण आणि विविध क्षेत्रातील शिक्षणाच्या उपलब्ध होणाऱ्या संधी, यामुळे हे विद्यार्थी शिक्षणासाठी भारतातील विद्यापीठांची निवड करत असल्याचे दिसून येते.

शहरात शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, त्यांना भारताबद्दल आत्मियता असल्याचे आढळून आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दरवर्षी पाचशेहून अधिक परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी नोंदणी करतात. यात प्रामुख्याने कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील पारंपरिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने अधिक असते.

विद्यार्थ्यांची देवाण-घेवाण (स्टुडंट एक्‍स्चेंज प्रोग्रॅम) उपक्रमांतर्गत हजारो परदेशी विद्यार्थी विशिष्ट कालावधीसाठी पुण्यात येतात. यामध्ये कला, ललित कला यातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. तंत्रशिक्षण, वैद्यकीय आणि व्यवस्थापनशास्त्र शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने कमी असून यात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी अभ्यासक्रम अद्ययावत करणे महत्त्वाचे आहे, असे पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी अधोरेखित केले. तर भारती अभिमत विद्यापीठात यंदा ५४१ परदेशी विद्यार्थ्यांची नोंद झाली असून ते कला, वाणिज्य, विज्ञान याबरोबरच फार्मसी, वैद्यकीय शिक्षणही घेत असल्याचे विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी सांगितले.

देशातील परदेशी विद्यार्थ्यांची आकडेवारी (२०१७-१८)
भारतात जवळपास १६६ देशांमधील ४६ हजार १४४ परदेशी विद्यार्थी आहेत. यामध्ये नेपाळमधील विद्यार्थ्यांची संख्या २५ टक्के आहे. त्याखालोखाल अफगाणिस्तान (९.५टक्के), सुदान (४.८ टक्के), भूतान (४.३ टक्के)  नायजेरिया (४ टक्के) , बांगलादेश आणि इराण (३.४ टक्के), येमेन (३.२ टक्के), यूएस (३.१ टक्के), श्रीलंका (२.७ टक्के). नेपाळमधील विद्यार्थिनींची संख्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक आहे. कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे जवळपास १२ हजार ४१ परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्याखालोखाल उत्तर प्रदेश (४,४६५), महाराष्ट्र (४,३०६), पंजाब (३,५४२) या राज्यांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांचा ओढा असतो.
(केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखिल भारतीय उच्चतर शिक्षण सर्वेक्षण (एआयएसएचई) २०१७-१८ या अहवालानुसार)

 भारतातील शिक्षण हे इतर देशांच्या तुलनेत स्वस्त असल्याने मी २०११मध्ये भारतात आलो आणि पुणे विद्यापीठात अर्थशास्त्राचे शिक्षण घेण्याचे ठरविले. त्यानंतर २०१२मध्ये पदवी शिक्षणासाठी पूना कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि याच महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
- अजेकीअल बॉक, परदेशी विद्यार्थी, नायजेरिया

भारतातील शिक्षण पद्धती बरीच सुधारलेली आहे. तसेच शिक्षणही माफक शुल्कात होते. त्यामुळे टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठात अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
- मायोकुन अकन्सेनिया, परदेशी विद्यार्थी, नायजेरिया

Web Title: Foreigh Student Education in india