परदेशी पर्यटकांना भुरळ दिवे घाटाची 

Mastani lake
Mastani lake

फुरसुंगी - दरवर्षी पावसाळ्यात दिवे घाटात लहान धबधबे तयार होतात, परंतु यंदाच्या परतीच्या जोरदार पावसाने पंधरा-वीस वर्षांनंतर दिवे घाटात कोकणातील धबधब्यांसारखे धबधबे कोसळू लागले आहेत. त्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी, घाटातील थंडगार हवा अनुभवण्यासाठी, उंच घाटातून ऐतिहासिक मस्तानी तलावाचे दिसणारे विहंगम दृश्‍य डोळ्यांत साठवत नेत्रसुखद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी सध्या हडपसर-सासवड रस्त्यावरील दिवे घाट देशी-विदेशी पर्यटकांनी चांगलाच फुलून गेला आहे. 

कोकणघाटातील धबधब्यांसारखा आनंद घराशेजारच्याच दिवे घाटात घेण्यासाठी सध्या घाटात मोठी गर्दी होत आहे. हिरव्यागार वातावरणात घाटाखालील ऐतिहासिक मस्तानी तलाव अधिक आकर्षक दिसत आहे. हा तलाव पाहणे, घाटातील हिरवाईचा आनंद घेण्यासाठी शहर परिसरातील नागरिकांसह परदेशी पर्यटकांना येथील निसर्गाची भुरळ पडत आहे. 

घाटरस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या हिरव्या झाडीतून नागमोडी रस्त्याने प्रवास करताना प्रत्येकाच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित न झाल्या तरच नवल. याच्या जोडीला उंच घाटातला अंगाला झोंबणारा थंडगार वारा प्रवाशांना उल्हासित करतो. एरवीही शहरातील धकाधकीच्या दैनंदिनीत त्रस्त झालेले कुटुंब कबिल्यासह गावाकडे जाताना आवर्जून घाटात थांबून मुलाबाळांसह घाटनिसर्गाचा आनंद घेत आहेत. सासवडकडे जातानाच्या घाटाच्या शेवटच्या वळणावर पर्यटकांची दिवसभर गर्दी होत आहे. या उंचीवरून खाली दऱ्यांच्या कुशीत विसावलेल्या, हिरव्या झाडीत चमकणाऱ्या ऐतिहासिक चंदेरी मस्तानी तलावाचे विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी व या पार्श्वभूमीवर प्रियजनांसह छायाचित्रे काढून घेण्यासाठी गर्दी होत आहे. येथे कट्ट्यांवर बसून मक्‍याची कणसे, पॉपकॉर्न, भडंग, गरमागरम कांदाभजी खाण्याचा आनंदही लुटला जात आहे. 

जेजुरी, सासवड, मोरगाव, पंढरपूर, नारायणपूर, केतकावळ्याचा बालाजी येथे देवदर्शनासाठी निघालेले भाविक घाटात थांबून निसर्गाचा आनंद घेत आहेत. प्रेमी युगले या गर्दीपासून थोड्या अंतरावरील दरीकडील बाजूला थांबून निसर्गानंद अनुभवत आहेत. घाटात न थांबणाऱ्या एसटी, बसमधील प्रवासीही खिडकीतून तरी धबधबे, मस्तानी तलाव, खोल दऱ्यांची भेदकता पाहता यावी म्हणून प्रयत्न करताना दिसतात. परदेशी पर्यटकांच्या फेऱ्याही घाटात वाढल्या आहेत. 

""यंदा धबधब्यांमुळे या घाटाचे सौंदर्य अधिकच खुलले आहे, मात्र घाटात दरडी कोसळण्याच्या घटना सतत घडतात. यासाठी दरडींना जाळ्या बसवणे गरजेचे आहे. पर्यटक पाय घसरून दरीत पडण्याची शक्‍यता असल्याने दरीकडील बाजूला सर्व ठिकाणी कठडे बांधणे आवश्‍यक आहे. अपघात टाळण्यासाठी वळणांवरील झाडोरा काढणे, रस्ता रुंद करणे, चांगले सुशोभीकरण करणे, घाटात स्वच्छता ठेवणे, घाटाखालील मस्तानी तलावाची आकर्षकता वाढवणे या बाबी झाल्या, तर घाटात अधिक संख्येने पर्यटक येतील.'' 
- अमीत लोणकर, पर्यटक 

""धबधब्यांमुळे या वर्षी घाटात अधिक गर्दी होत असल्याने आमचा व्यवसाय चांगला होत आहे. मात्र, अनेक हुल्लडबाज येथे गोंधळ घालत असल्याने अपघाताचा धोका संभवतो. पोलिसांनी येथे सुरक्षाव्यवस्था ठेवणेही गरजेचे आहे.'' 
- रामभाऊ कांबळे, घाटात खाद्यपदार्थ विकणारे व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com