
सोशल मीडियावर कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा नेम नाही. कधी हॅशटॅग ट्रेंड, तर कधी एखादा चॅलेंज ट्रेंड. सध्या सोशल मीडियावर साडी ट्रेंड व्हायरल होत आहे. अनेकजणी साडी नेसून त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यामध्ये देशातल्या, परदेशातल्या अनेक महिला साडीमधले फोटो शेअर करत सहभागी झाल्या आहेत. या साडीची क्रेझ काही परदेशी पाहुण्यांमध्ये पाहायला मिळते.
पुणे - सोशल मीडियावर कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा नेम नाही. कधी हॅशटॅग ट्रेंड, तर कधी एखादा चॅलेंज ट्रेंड. सध्या सोशल मीडियावर साडी ट्रेंड व्हायरल होत आहे. अनेकजणी साडी नेसून त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यामध्ये देशातल्या, परदेशातल्या अनेक महिला साडीमधले फोटो शेअर करत सहभागी झाल्या आहेत. या साडीची क्रेझ काही परदेशी पाहुण्यांमध्ये पाहायला मिळते. विविध साड्या घालून या परदेशी महिला वेगवेगळे फोटो काढतात. ‘साडी लंच पार्टी’ अशी नवीन थीम या महिलांमध्ये गाजत आहे. सध्या मगरपट्टा सिटीमध्ये राहणाऱ्या थायलंड येथील मूनथाथीप थनापिट या २००८ मध्ये कामानिमित्त भारतात आल्या आणि तेव्हापासूनच साडीच्या प्रेमात पडल्या.
भारतातील महिलांचा साडीमधला वावर पाहून आणि सणासुदीला वेगवेगळ्या रंगीत व आकर्षक साड्या पाहून थनापिट यांच्यामध्ये साड्यांविषयी वेगळीच क्रेझ निर्माण झाली. घोरपडीमध्ये राहत असताना गणपतीच्या वेळेस सोसायटीमधल्या सर्व महिलांनी व छोट्या मुलींनी साड्या घातलेल्या पाहून आपणही अशी साडी घालावी, अशी इच्छा त्यांनी शेजारील महिलेकडे व्यक्त केली आणि त्या शेजारणीने त्यांची इच्छा पूर्ण करीत साडी नेसायला शिकविली. एका कार्यक्रमानिमित्त त्यांनी २०१५ मध्ये साडी परिधान केली आणि त्या साडीच्या प्रेमातच पडल्या. त्या कार्यक्रमादरम्यान त्यांचे खूप कौतुक झाले. तेव्हापासून त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये साडी घालण्यास सुरुवात केली. त्यांचा साडीमधला वावर पाहून त्यांच्या इतर परदेशी मैत्रिणींनीही साडी घालण्याची इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली.
दरम्यान पाच - सात वर्षांमध्ये त्यांचा अनेक देशी आणि परदेशी महिलांचा मोठा ग्रुप तयार झाला. या सगळ्या परदेशी महिलांना साडीविषयी खूप आकर्षक व कुतूहल वाटत होते. या सगळ्यांनी एकदा साडी घालण्याचा बेत आखला आणि त्यांची ‘साडी लंच पार्टी’ ही थीम तेव्हापासून सुरू झाली. आतापर्यंत थनापिट यांच्या या ग्रुपच्या विविध हॉटेलमध्ये पंचवीस पार्ट्या झाल्या असून, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात सव्वीसावी पार्टी होणार आहे.
त्यांच्या या साडीपार्टीमध्ये चाळीसपेक्षा जास्त सभासद आहेत. यामध्ये जर्मनी, स्वित्झर्लंड, अमेरिका, इंग्लंड आणि इतर देशांतील महिला सहभागी होत आहेत. दरवेळी यामध्ये नव्या पाहुण्या सहभागी होतात. अशा विविध उपक्रमांमुळे भारतीय साडी जगभर प्रसिद्ध होत असून, साडी नेसण्याचे प्रमाण परदेशी महिलांमध्ये वाढले आहे. सध्याच्या ट्रेण्डमुळे कदाचित साडीचे परदेशातही मागणी वाढेल, अशी आशा आहे.