वन विभागाचा वेळकाढूपणा बेतला माकडाच्या जिवावर 

monkey.jpg
monkey.jpg

शिर्सुफळ (पुणे) : माकडांसाठी प्रसिद्ध असलेल्या बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील एका जखमी माकडाला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये वनविभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी होत आहे. जसे माणसांमध्ये गटतट असतात, तसेच शिर्सुफळ येथील माकडांमध्येही श्री शिरसाई देवीच्या मंदिरातील, गावठाणातील आणि परिसरातील वाड्या वस्त्यांवरील, असे माकडांचे तीन गट आहेत. जर, एखादे माकड दुसऱ्या ठिकाणी गेले, तर त्यांच्यात प्रचंड गोंधळ होतो. नव्याने आलेल्या माकडाला परत आपल्या गटात जाणे भाग पाडतात. असे असताना गेल्या तीन- चार महिन्यांपासून गावामध्ये एक नविन माकड आले होते. त्याला कोणत्याच गटात घेतले जात नव्हते. त्यामुळे गावातील माकडे व त्याच्यात सतत भांडणे व्हायची. तरीही ते नविन माकड गावात चांगले रमले होते. 

दरम्यान, गावामध्ये वर्षातून एक- दोन वेळा एक दोन वानरे येतात. ती गावामध्ये धुमाकूळ घालतात. त्याप्रसंगी गावातील माकडे मंदिराच्या डिकमळीमध्ये, झाडाच्या आडोशाला किंवा मोबाइलच्या मनोऱ्यावर जाऊन स्वतःचा बचाव करतात. शनिवारी (ता. १०) गावामध्ये दोन वानरे आली. या वेळी गावातील पूर्वीची सर्व माकडे आरडाओरडा करत सर्वांना सूचना करत सुरक्षितस्थळी गेली. मात्र, हे नविन आलेले माकड या दोन वानरांना सामोरे गेले. या वेळी त्याने एका वानरावर हल्लाही केला. मात्र, या दोन्ही वानरांनी एकत्र येत या नविन माकडाला गंभीर जखमी केले व ती पसार झाली. 
जखमी अवस्थेत हे माकड गावात दिवसभर फिरत राहिले. रविवारी (ता. ११) गावातील ग्रीन वल्ड फाउंडेशनचे सदस्य फरदीन शेख यांनी वन विभागाला संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून कोणीही आले नाही. तसेच, पशुवैद्यकीय विभागाच्या माध्यमातून डॉ. रामदास गाडे यांच्या सूचनेप्रमाणे डॉ. फाळके यांनी त्याच्या जखमेवर हळद टाकून प्राथमिक उपचार केले.

या वेळी त्यांनी जखम मोठी असल्याने वनविभागाने माकड ताब्यात घेऊन पुढील उपचार करावेत, अशी सूचना केली. त्यानुसार शेख यांनी पाठपुरावा सुरु ठेवला. शेवटी रात्री दहा वाजता वनविभागाचे कर्मचारी आले. मात्र, या माकडाची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसमोरच मृत्यूसोबतची झुंज संपली. त्यामुळे ग्रामस्थांमधून दुःख व्यक्त होत आहे. 

माकडांना देव मानणारे गाव 
शिर्सुफळ हे माकडांना देव मानणारे गाव आहे. शेतामध्ये पिकलेल्या धान्यातील पहिला वाटा माकडांसाठी देण्याची येथे प्रथा आहे. हे माकड जरी बाहेरचे असले, तरी तीन- चार महिन्यात गावचा एक भाग बनले होते. उपचाराअभावी त्याचा मृत्यू होणे दुर्दैवी आहे. याबाबत वनविभागाने योग्य ती खबरदारी घेऊन यापुढे अशी वेळ येणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे सरपंच अप्पासाहेब आटोळे यांनी मत व्यक्त केले. 
 

जखमी माकड गावात इकडे तिकडे फिरत होते. रक्तस्राव जास्त झाल्याने नंतर ते एका ठिकाणी पडून राहिले. मी वेळोवेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क केला. तसेच, वरिष्ठ कार्यालयासही कळविले. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. वेळेत उपचार मिळाले असते, तर माकडांचा जीव वाचला असता. 
- फरदीन शेख, प्राणी प्रेमी 
 

 

शिर्सुफळ येथील जखमी माकडाबाबत माहिती मिळताच उपाययोजना सुरु करण्यात आल्या. मात्र, पिंजरा घेऊन जाण्यासाठी गाडीला नियमित चालक नाही. अडचणीवेळी चालक म्हणून काम करणारे आजारी होते. तसेच, रविवार असल्यामुळे पोचण्यास उशीर झाला. मात्र, यापुढे काळजी घेण्यात येईल. 
- अमोल पाचपुते, वनपाल, बारामती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com