‘सीड्‌स बॉल’मधून फुलणार वनसंपदा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

पुणे - टेनिस बॉल, क्रिकेट बॉल, इतकंच नव्हे, तर तुम्ही आइस बॉलचं नाव ऐकलं असेल ना! पण तुम्हाला ‘सीड्‌स बॉल’ माहीत आहे का? माती आणि शेणाच्या मिश्रणात एखादी ‘बी’ घालून त्यातून ‘सीड बॉल’ म्हणजेच चिखलाचे गोळे तयार करण्यात येत आहेत. आता हेच ‘सीड्‌स बॉल’ शहराभोवतीच्या मोकळ्या परिसरात, टेकड्यांवर जमिनीमध्ये लावून झाडे लावण्याचा अभिनव उपक्रम हाती घेण्यात येत आहे.

‘द सोसायटी फॉर सायन्स, एन्व्हॉयर्मेंट ॲण्ड पीपल’ आणि ‘भवताल’ या संस्थांनी यंदा झाडे लावण्यासाठी ‘सीड्‌स बॉल’ हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या दोन्ही संस्थांचे स्वयंसेवक लोकांकडून बिया जमा करण्याचे काम करत आहेत. त्या बिया लवकरच ‘सीड्‌स बॉल’मध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. 

याविषयी स्वयंसेवक इरावती बरसोडे म्हणाल्या, ‘‘या उपक्रमांत नागरिकांना सहभागी करून घेण्यात येईल. चिंच, कडुनिंब, हेरडा, बेरडा अशा स्थानिक प्रजातींच्या झाडांच्या बिया जमा करून घेतल्या जातील. शेण आणि मातीमध्ये ‘बी’ घालून स्वयंसेवक आणि हौशी नागरिकांच्या मदतीने त्याचे गोळे केले जातील. नुसत्या बिया मोकळ्या जागेत टाकल्यास, त्या पक्षी खाऊ शकतात किंवा ‘बी’ उडून दुसरीकडे जाऊ शकते. मात्र, ‘सीड्‌स बॉल’मुळे ‘बी’ त्यात रुजण्यास आणि त्यातून रोपटे तयार होण्यास मदत होणार आहे.’’

प्रायोगिक तत्त्वावर पाचशे ते हजार ‘सीड्‌स बॉल’ तयार करण्याचा दोन्ही संस्थांच्या स्वयंसेवकांचा मानस आहे. यासाठी विशेष कार्यशाळा घेणार असून हे ‘सीड्‌स बॉल’ गिर्यारोहक, पर्यावरणप्रेमींनाही देण्यात येतील. पंढरीच्या वारीच्या वेळी वारकऱ्यांच्या सहयोगाने हे बॉल्स ‘आळंदी ते पंढरपूर’ मार्गावर जमिनीत पेरण्यासाठी काही दिंडीप्रमुखांशी बोलणे सुरू असल्याचेही बरसोडे यांनी नमूद केले. 

तुम्हीही व्हा सहभागी
कधी - २० आणि २७ मे २०१७
कुठे - इंद्रधनुष्य सभागृह, राजेंद्रनगर
केव्हा - दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत.

Web Title: forest estate bloom in seeds ball