एमएसआरडीसीच्या रिंगरोडचा विसर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने  (पीएमआरडीए) हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा (कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन - सीएमपी) तयार करण्यासाठी नेमलेल्या ‘एल ॲण्ड टी’ कंपनीला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडचा विसर पडला आहे. या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या दोन हजार चौरस किलोमीटरच्या परिसराच्या नकाशात त्या रिंगरोडचा समावेश नसल्याचे दिसून आले आहे.

पीएमआरडीएने सात हजार २०० चौरस किलोमीटर लांबीच्या हद्दीचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम एल ॲण्ड टी या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात पुणे-पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील सुमारे दोन हजार चौरस किलोमीटर हद्दीतील वाहतूक आराखडा सादर करण्यात आला आहे. त्यामध्ये पीएमआरडीएचा रिंगरोड, मेट्रो, बीआरटी, बायपर लूप, आदी प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. मात्र त्यामध्ये एमएसआरडीसीच्या रिंगरोडचा समावेश केलेला नाही.

पुणे-पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएबरोबरच एमएसआरडीसीकडून देखील रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रिंगरोड सुमारे १६६ किलोमीटर लांबीचा आहे. पीएमआरडीए आणि एमएसआरडीचा सुमारे चाळीस किलोमीटर लांबीचा रिंगरोड एकाच गावातून जात असल्यामुळे एकत्रित करण्यात आला आहे. तसेच एमएसआरडीसीच्या रिंगरोडला यापूर्वीच केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. असे असताना या रिंगरोडचा समावेश सर्वंकष वाहतूक आराखड्यात न झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

झपाट्याने प्रगती होणारा परिसर, वाढते उद्योगधंदे आणि लोकसंख्या असलेल्या भागातील वाहतुकीचा विचार आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात  करण्यात आला आहे. संपूर्ण आराखडा अद्याप तयार झालेला नाही. एमएसआरडीसीच्या रिंगरोडचा समावेश या अहवालात करण्यात येणार आहे.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

‘एल ॲण्ड टी’कडून वाहतूक आराखडा 
 सात हजार २०० चौरस किलोमीटर हद्दीचा विचार
 दोन हजार चौरस किलोमीटरचा पहिला टप्पा
 एमएसआरडीसीचा रिंगरोड १६६ कि.मी.चा
 चाळीस कि.मी.चा रिंगरोड एकत्रित 

Web Title: Forget the MSRDC ring road