'शिवसेनेच्या वाघाच्या झाल्या शेळ्या-मेंढ्या' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

''शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून, त्याच्या शेळ्या-मेंढ्या झाल्या आहेत,'' अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केली. 

पुणे : "शिवसेनेच्या आमदारांमध्ये वैचारिक नीतिमत्ता उरलेली नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत असताना महापालिकेत टक्केवारी घेऊन कामे केली जात आहेत. पैसे देऊन आमदार, महापौर, नगरसेवक होता येते, हे शिवसैनिकांनाही आता माहिती आहे, त्यामुळे शिवसेनेचा वाघ आता राहिलेला नसून, त्याच्या शेळ्या-मेंढ्या झाल्या आहेत,'' अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केली. 

सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये "युवर्स टूली नारायण राणे' कार्यक्रमात ते बोलत होते. राणे यांनी नुकत्याच लिहिलेल्या "झंझावात' या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या निमित्ताने पत्रकार राजू परुळेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 
राणे म्हणाले, ""शिवसेनेला मी नको असल्याने त्यांनी भाजपप्रवेशात आडकाठी आणली. त्यांना माझी भीती वाटते. मात्र, मी भाजपात जाणार हे पक्के आहे. मी भाजपमध्ये स्वतःहून प्रवेश करण्यास जात नसून, त्यांनी मला बोलावलं आहे.'' 

कॉंग्रेसवर टीका करताना राणे म्हणाले की, कॉंग्रेसच्या पराभवाला कॉंग्रेसचे नेतेच कारणीभूत आहेत. पक्ष तळागाळापर्यंत पोचला असतानाही ते लोकांपर्यंत गेले नाहीत. त्यात अध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत कमी आहे. पक्षासाठी काही करावे, अशी नेत्यांची नीतिमत्ता नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former cm narayan rane critisize shivsena