माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे निधन

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 1 डिसेंबर 2018

दौंड (पुणे) : दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव बाजीराव उर्फ बाळासाहेब जगदाळे-पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. लहानथोरांशी आदराने बोलणारे निष्कलंक व आजातशत्रू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.

दौंड (पुणे) : दौंड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव बाजीराव उर्फ बाळासाहेब जगदाळे-पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. लहानथोरांशी आदराने बोलणारे निष्कलंक व आजातशत्रू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.

पुणे येथे औषधोपचारासाठी दाखल केले असता त्यांचे आज (ता. १) दुपारी निधन झाले. नेपाळमधील राजघराण्याशी संबंध असणारे आणि वंशपरंपरागत दौंडचे पाटील असणारे बाळासाहेब जगदाळे यांनी सन १९८० ते ८५ या कालावधीत काँग्रेसचे आमदार म्हणून दौंड विधानसभा मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेत त्यांनी सक्रिय योगदान दिले होते. तसेच ते या कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष होते. पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत कुरकुंभ येथे माळरानावर एमआयडीसी स्थापन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी नोंदणीकृत केलेल्या दौंड सहकारी साखर कारखान्याचे कालांतराने आलेगाव (ता. दौंड) येथे दौंड शुगर लिमिटेड या खासगी साखर कारखान्यात रूपांतर झाले.

दौंड तालुक्यात सिंचन व दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणारे, रेल्वे आणि रेल्वे कामगार व प्रवाशांच्या प्रश्नांविषयी संवेदनशील असणारे, शेतीवर प्रेम करणारे, चारचाकी वाहनांचे चाहते, अशी त्यांची ओळख होती. 'आबा' या नावाने हे राजबिंडे व्यक्तिमत्व परिचित होते. जगदाळे यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ३ विवाहित कन्या, सूना व नातवंडे, असा परिवार आहे.

दौंड विधानसभेचे १९७२ ते ७८ आणि १९८५ ते १९९० असे दोन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी आमदार उषादेवी जगदाळे या त्यांच्या पत्नी होत. पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य तथा दौंड शुगर लिमिटेडचे संचालक वीरधवल जगदाळे व नगरसेवक इंद्रजित जगदाळे हे त्यांचे पूत्र होत. त्यांच्या पत्नी तथा दोन्ही मुलांनी दौंड नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे. 

Web Title: Former MLA Balasaheb Jagdale Passes Away