माजी आमदार दिलीप मोहिते यांचा  अटकपूर्व जामीन मंजूर 

राजेंद्र सांडभोर
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

चाकण (ता. खेड) येथे गेल्यावर्षी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारप्रकरणात संशयित आरोपी करण्यात आलेले खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अंतिम अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती ढेरे यांनी आज (ता. 21) मंजूर केला. 

राजगुरुनगर (पुणे) : चाकण (ता. खेड) येथे गेल्यावर्षी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात झालेल्या हिंसाचारप्रकरणात संशयित आरोपी करण्यात आलेले खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा अंतिम अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती ढेरे यांनी आज (ता. 21) मंजूर केला. 

मोहिते यांना अंतरिम अटकपूर्व जामीन 26 जुलै रोजी मिळाला होता. त्याच्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याने याप्रकरणी मोहिते यांची अटक टळली आहे. न्यायालयाने त्यांची 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर सुटका केली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार मोहिते यांच्यावर कोणताही गुन्हा निष्पन्न होत नाही. त्यामुळे त्यांच्या अटकेची गरज नाही, असे मत न्यायमूर्तींनी नोंदविल्याचे मोहिते यांचे वकील तपन थत्ते यांनी सांगितले. 

चाकण येथे गेल्या वर्षी झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलना वेळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी दिलीप मोहिते पाटील यांना संशयित आरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यावर या हिंसाचाराच्या कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी खेड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज न्यायाधीश ए. एम. अंबळकर यांनी 19 जुलै रोजी फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. 
त्यांच्या अंतिम अटकपूर्व जामिनासाठी आज उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती ढेरे यांच्यासमोर सुनावणी झाली. मोहिते यांच्या बाजूने त्यांचे वकील ऍड. मनोज मोहिते व ऍड. थत्ते यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायमूर्तींनी अंतिम जामीन मंजूर केला. 

मोहिते पाटील यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याची माहिती खेड तालुक्‍यात मिळताच सोशल मीडियावर "सत्य कधी पराजित होत नाही' या शीर्षकाखाली त्यांच्या समर्थकांनी पोस्ट केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former MLA of Khed Dilip Mohite Patil granted land before arrest