बालकाला विकण्यासाठी आलेल्या चौघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पुणे - पैशांच्या हव्यासापोटी स्वतःच्या एक महिन्याच्या बालकाला विकणाऱ्या मातेसह चौघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. हे बालक एका दांपत्याला तीन लाख रुपयांना विकणार होते, अशी माहिती उघडकीस आली आहे. न्यायालयाने आरोपींना 9 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

लतिका सोमनाथ पाटील (वय 23, रा. डोंबिवली पूर्व), दीप्ती संजय खरात (वय 30, रा. सिंहगड रस्ता, खडकवासला), आशा नाना अहिरे (वय 27, रा. उल्हासनगर, ठाणे) आणि केशव शंकर धेंडे (वय 42, रा. तरवडेवस्ती, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध बाल अधिनियम सन 2015 च्या कलम 81 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लतिका ही त्या बालकाची आई असून, अन्य आरोपी तिच्या ओळखीचे आहेत. ते पैशांच्या हव्यासापोटी कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयासमोर ग्राहकाच्या शोधात आहेत, अशी माहिती पोलिस कर्मचारी शंकर कुंभार यांना मिळाली. त्यावरून परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ आणि सहायक आयुक्‍त प्रवीण कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे, सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, कर्मचारी ज्ञानेश्‍वर देवकर, अमोल सरडे, हर्षल शिंदे, अमेय रसाळ आणि स्मिता सिताप यांनी ही कारवाई केली. 

दरम्यान, आरोपींनी यापूर्वी काही मुलांची विक्री केल्याचा संशय पोलिसांना असून, त्या दिशेने तपास करण्यात येत आहे, अशी माहिती सहायक निरीक्षक महेंद्र जाधव यांनी दिली.

Web Title: Four arrested for selling the child

टॅग्स