वेश्या व्यवसाय करणाऱ्या चार महिन्याच्या गर्भवतीने कोरोनाला हरवले

pregnant-women
pregnant-women

पुणे - सामाजिक अंतर ठेवले तर पोटाची खळगी कशी भरणार? या प्रश्नाने ती आगतिक झाली. त्यामुळे लॉकडाउनमध्ये सवलती दिल्यानंतर पुन्हा वेश्या व्यवसाय सुरू झाला. त्यानंतर काही दिवसातच तिला कोरोनाने गाठले. त्यात ती चार महिन्यांची गर्भवती. मात्र आधीच आयुष्याला अनेक संकटांची बाधा झाल्याने 'रेड लाईट एरिया'त आलेली ती कोरोनाला घाबरली नाही. स्वतःवर ओढावलेली परिस्थिती पोटातल्या बाळावर देखील येऊ नये. त्यामुळे हार मानून व घाबरून काहीच साध्य होणार नाही, असा निश्चय करून तिने कोरोनावर मात केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुरुवातीच्या लॉकडाऊन काळात बुधवार पेठमधील 'रेड लाइट एरिया'त कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र गेल्या महिन्यात तिथे देखील कोविडचा शिरकाव झाला. पूजा (नाव बदललेले) या त्याची पहिली शिकार बनल्या. लक्षणे आढळल्याने त्यांची चाचणी केली होती. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या काळात त्यांना कोणताही कौटुंबिक आधार मिळणार नव्हता. ना त्या राहात असलेल्या ठिकाणच्या मैत्रिणींची थेट साथ होती. गर्भवती असल्याने आपली परिस्थिती बिघडणार तर नाही ना, अशी शंका सुरुवातीला त्यांच्या मनात आली. मात्र काही वेळातच त्यांनी स्वतःला सावरले आणि कोरोनाविरुद्ध लढण्याचा निश्चय केला. डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी काही दिवसांतच कोरोनाला हरवले.

गर्भवती असल्याने टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर मी सुरुवातीला थोडीशी घाबरली होते. मात्र भीती मनात बाळगली तर प्रकृती आणखी बिघडू शकते व त्याचा वाईट परिणाम पोटातल्या बाळावर होईल, असे डॉक्टरांनी समजून सांगितले. त्यानंतर मी देखील मनाचा निर्धार केला की, आयुष्यात आलेली अनेक संकटं आत्तापर्यंत परतून लावली आहेत. कोरोनाला देखील मोठ्या धीराने सामोरे जाऊ.
पूजा

 
लक्षणे आढळल्याने पुजा यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर आणखी एक महिला आणि तीन फेरीवाले देखील पॉझिटिव्ह सापडले होते. पूजाने डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन करत भिती न बाळगता उपचार घेतले. येथील सर्व महिलांची तपासणी करणे गरजेचे आहे. 
सारिका लष्करे, प्रकल्प प्रमुख, कायाकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com