तुरूंगाधिकाऱ्यांवर गोळीबारप्रकरणी चार जण ताब्यात

दिलीप कुऱ्हाडे
शनिवार, 7 जुलै 2018

तुरूंग अधिकाऱ्यांना पिस्तुलजवळ बाळगण्याचे आदेश 

कारागृहातील अधिकाऱ्यांकडे पिस्तुल असते. मात्र, ते जवळ बाळगत नाही. त्यामुळे राज्यातील सर्वच कारागृहातील अधिकाऱ्यांना पिस्तुलजवळ बाळगण्याचे आदेश दिले आहेत.

- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, कारागृह महानिरीक्षक तथा अप्पर पोलिस महासंचालक

येरवडा : येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात तुरुंग अधिकारी मोहन सुभाष पाटील (वय 35) यांच्यावर गोळीबार केलेल्या मुख्य सुत्रधारासह चार जणांना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले. यात आरोपींची चौकशी सुरू असल्याची माहिती परिमंडळ चारचे उपायुक्त दिपक साकोरे यांनी दिली.

याबाबत साकोरे म्हणाले, "पाटील शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास घरातून कारागृहाकडे निघाले होते. यावेळी मुख्य सूत्रधार निलेश ऊर्फ तात्या संभाजी वाडकर (वय 24, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) याने पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. सुदैवाने ते बचावले होते. तर पाटील यांनी गोळीबारानंतर आरडा-ओरडा करून दुचाकीवरून आलेल्या आरोपींच्या दिशेने छत्री भिरकावली होती. त्यामुळे आरोपी दुचाकीवरून पळून गेले होते. येरवडा कारागृहाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचे छायाचित्र मिळाले होते. त्यामुळे पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेसह येरवडा पोलिस समांतर तपास करीत होते.

सहाय्यक पोलिस आयुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गवारी, आनंदसिंग साबळे, दत्तात्रय मोहिते, बाळासाहेब बहिरट, ख्रिस्तोफर मकासरे, अजिज बेग यांनी रात्रभर शोधमोहिम राबवून आरोपींना जेरबंद केले. यामध्ये वाडकरसह ओंकार चंद्रकांत बेलुरे (वय 19, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा), कुणाल नितीन कानडे (वय 25, रा.शास्त्रीचौक, भोसरी), ऋषीकेश राजेश चव्हाण (वय 19, रा. कात्रज) अशी या आरोपींचे नावे आहेत.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाटील यांची कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांच्या कडक शिस्तीचा अनुभव आरोपींना आला होता. त्यामुळे त्यांनी हा कट आखला होता. यामागे केवळ धमकावण्याचा प्रयत्न होता, की जीवे मारण्याचा याचा अधिक तपास सुरू असल्याचे वाघचौरे यांनी सांगितले. 

Web Title: Four people were arrested in connection with the firing