कोरोना लढाई जिंकलेल्या पोलिसांकडून प्लाझ्मा दानचा आदर्श 

प्रफुल्ल भंडारी
Wednesday, 23 September 2020

कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचाराने बरे झालेल्या दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) चार पोलिसांनी अन्य कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी स्वेच्छेने प्लाझ्मा दान केले.

दौंड (पुणे) : कोरोनाची बाधा झाल्यानंतर उपचाराने बरे झालेल्या दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) चार पोलिसांनी अन्य कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी स्वेच्छेने प्लाझ्मा दान केले. मुंबई येथून बंदोबस्त करून दौंड येथे परतलेल्या एसआरपीएफ गट क्रमांक पाच व सातमधील पोलिस नाईक सोनू जोशी, महेंद्र पाटील, संतोष लिखे व दत्तात्रेय दाभाडे यांना कोरोनाची बाधा झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपचारानंतर बरे झाल्यावर गट क्रमांक पाचचे वैद्यकीय अधिकारी डॅा. नितीन भोसले यांनी त्यांना कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून २८ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्याने प्लाझ्मा दान करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच, गट क्रमांक पाचचे समादेश तानाजी चिखले व गट क्रमांक सातचे समादेशक श्रीकांत पाठक यांनी देखील प्लाझ्मा दानसाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर स्वेच्छेने या चार पोलिसांनी पिंपरी येथे जाऊन प्लाझ्मा दान केले. त्यांनी दान केलेले प्लाझ्मा पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना देण्यात आला. एसआरपीएफचे पोलिस कल्याण अधिकारी सचिन डहाळे व उप निरीक्षक दिलीप तडाखे यांनी या कामी सहकार्य केले.                                                    

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दौंड शहरातील एसआरपीएफ गट क्रमांक पाच , गट क्रमांक सात आणि इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या (आयआरबी) एकूण ८८ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ७९ जण उपचारानंतर बरे झाले आहेत तर ०९ जणांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्यांपैकी २५ पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी प्लाझ्मा करिता रक्तदान केलेले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four policemen from Daund donated plasma