Video : 'गाव तिथे ग्रंथालया'साठी चार हजार पुस्तके गोळा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एकलव्य सामाजिक विज्ञान बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आहे. "गाव तिथे ग्रंथालय' सुरू करण्यासाठी संस्था तीन वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. त्यातून राज्यातील वेगवेगळ्या भागांत मुलांसाठी ग्रंथालये उभी राहिली आहेत. 

पुणे : इच्छा असूनही शिक्षणापासून लांब राहणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांच्या हातात आता पुस्तकांचा खजिना पडणार आहे. आदिवासी पाड्यापासून शहरांभोवतीच्या गावांतील मुला-मुलींसाठी एकलव्य सामाजिक विज्ञान बहुउद्देशीय संस्थेतर्फे राबविण्यात आलेल्या "गाव तिथे ग्रंथालय' या उपक्रमांतर्गत चार हजार पुस्तकांचे संकलन झाले. पुस्तकांसोबत शालेय साहित्यही देऊन पुणेकरांनी या उपक्रमाची व्याप्ती वाढविली. 

ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एकलव्य सामाजिक विज्ञान बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेतला आहे. "गाव तिथे ग्रंथालय' सुरू करण्यासाठी संस्था तीन वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. त्यातून राज्यातील वेगवेगळ्या भागांत मुलांसाठी ग्रंथालये उभी राहिली आहेत. 

या ग्रंथालयांसाठी आवश्‍यक पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी शहरामध्ये पुस्तकसंकलन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुस्तकांचे संकलन करण्यात आले. यामध्ये 120 पुणेकरांनी विविध क्षेत्रांशी संबंधित सुमारे 4 हजार पुस्तके दिली. या संकलन मोहिमेस तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

राज्यातील विविध शहरांतून आजवर 30 हजारांहून जास्त पुस्तके विदर्भ, मराठवाडा, कोकण विभागातील 30 पेक्षा जास्त ग्रंथालयांत पोचविली आहेत. दोन वर्षांपासून पुणेकर या उपक्रमास भरभरून मदत करीत आहेत. राज्य सरकारच्या ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र स्पर्धेत "पीपल्स चॉइस' पुरस्काराने संस्थेला सन्मानित करीत या योजनेचा गौरव करण्यात आला आहे. 

या उपक्रमाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या संकलनामुळे ग्रंथालयांमार्फत गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार असून, त्यांना त्याचा फायदा होईल. सांगली, कोल्हापूरमधील पुरामुळे ज्या ग्रंथालयांचे नुकसान झाले आहे, त्यांना संस्था मदत करणार आहे. 
- राजू केंद्रे, अध्यक्ष, एकलव्य संस्था 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four thousand books collected for Village There Library