पोलिसांच्या "कोम्बिंग ऑपरेशन'मध्ये 14 गुन्हेगार ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी एकत्रितपणे शनिवारी शहरामध्ये "कोम्बिंग ऑपरेशन' राबवून 14 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले, तर शहरामध्ये कायद्याचे उल्लंघन करीत पहाटेपर्यंत सुरू असलेल्या 32 हॉटेल्स, पबविरुद्ध कारवाई करून, त्यांच्याविरुद्ध खटले दाखल केले.

पुणे - गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी एकत्रितपणे शनिवारी शहरामध्ये "कोम्बिंग ऑपरेशन' राबवून 14 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले, तर शहरामध्ये कायद्याचे उल्लंघन करीत पहाटेपर्यंत सुरू असलेल्या 32 हॉटेल्स, पबविरुद्ध कारवाई करून, त्यांच्याविरुद्ध खटले दाखल केले. याबरोबरच जुगार, अवैध दारू विक्री करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. 

गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांच्या आदेशानुसार, दोन दिवसांपासून शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गुन्हे शाखेच्या सर्व पथकांनी एकत्र येऊन "कोम्बिंग ऑपरेशन' राबविले. त्यामध्ये सराईत गुन्हेगारांचा शोध घेणे, उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, पब, जुगार अड्डे, अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यावर भर देण्यात आला. शनिवारी रात्री दहा ते रविवारी पहाटे पाच या वेळेत ही कारवाई करण्यात आली. यात 26 सराईत गुन्हेगारांपैकी 14 गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. 

पोलिसांनी बंडगार्डन, कोरेगाव पार्क, मुंढवा, वानवडी, चतुःशृंगी, औंध या ठिकाणांसह शहराच्या वेगवेगळ्या भागातील 100 हून अधिक हॉटेल्सची तपासणी केली. त्यामध्ये वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल आलोहा द टिक्की बार, बॅकस्टेज पब, डस्क पब, मकाझा पब, पुणे सोशल, हॉटेल 360 डिग्रीज, नाइट रायडर, कनक, हॉटेल पब्लिसिटी, हॉटेल फ्लाय हाय यांसारख्या 32 हॉटेल्स व पबविरुद्ध कारवाई करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये न्यायालयामध्ये खटले दाखल केले आहेत. दरम्यान, वारजे माळवाडी येथे अवैध दारू विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेऊन, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे, असा इशारा बच्चन सिंग यांनी दिला आहे. 

जुगार अड्डाप्रकरणी  15 जणांना अटक 
कॅम्पमधील भीमपुरा परिसरामध्ये अनेक वर्षांपासून जुगार अड्डा चालविणाऱ्यासह 15 जणांना पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने शनिवारी अटक केली. राजू जनार्दन श्रीगिरी याच्यासह 15 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून जुगार खेळण्याचे साहित्य व दहा हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fourteen criminals arrested in police combing operation