पुण्यातील उद्योगपतीकडून बँकेला 293 कोटींचा गंडा; ईडीचे छापे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जून 2019

- पीएनबीप्रमाणेच कोट्वधींचा झाला गैरव्यवहार.

पुणे : पंजाब नॅशनल बॅंकेला गंडा घालणाऱ्या नीरव मोदीप्रमाणेच एका उद्योजकाने बॅंकेस खोटी कागदपत्रे सादर करून कर्वे रस्त्यावरील बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेस तब्बल 293 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील उद्योजकाच्या पुणे, सांगली, रत्नागिरी व नागपूर या शहरातील कारखाने, घरे व कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी एकावेळी छापे घातल्याने एकच खळबळ उडाली. 

श्रीकांत पांडुरंग सवईकर असे बॅंकेची फसवणूक करणाऱ्या उद्योजकाचे नाव आहे. याप्रकरणी बॅंक ऑफ इंडियाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) गुन्हा दाखल केला होता. त्यावरून त्याच्याविरुद्ध मनी लॉंडरींग कायद्यानुसार सवईकर, वरुण ऍल्युमिनिअम प्रायव्हेट लिमिटेड (व्हिएपीएल) या कंपनीच्या संचालक, बॅंकेचे अधिकारी व अन्य व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. "ईडी'च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,सवईकर याच्या वरुण ऍल्युमिनिअम प्रायव्हेट लिमिटेड (व्हिएपीएल) आणि वरुण ऑटो कॉम्प प्रायव्हेट लिमिटेड अशा दोन कंपन्या आहेत. सवईकर याचे बॅंक ऑफ इंडियाच्या कर्वे रस्त्यावरील शाखेत बॅंक खाते आहे. त्याने कॅनरा बॅंकेच्या डेक्कन जिमखाना शाखेमध्ये बनावट "लेटर ऑफ क्रेडिट' (एलसी) तयार करून घेतले. ते "एलसी) बॅंक ऑफ इंडियाच्या कर्वे रस्त्यावरील शाखेतील खात्यामध्ये वटविले. या "एलसी'च्या आधारे दिलेली रक्कम बॅंक ऑफ इंडियाने कॅनरा बॅंकेकडे मागितली. तेव्हा, कॅनरा बॅंकेने संबंधित "एलसी' आमच्या बॅंकेने दिले नसल्याचे स्पष्ट केले.

याबरोबरच संबंधित बिले कॅनरा बॅंकेच्या व्यवस्थेतून गेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी सीबीआयकडे सवईकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.त्यानुसार या प्रकरणाची "ईडी'कडून समांतर चौकशी करण्यात येत होती. खोट्या "एलसी'च्या आधारे सवईकर यास तातडीने 293 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या रकमेतून सवईकर याने जुन्या कर्जाची फेड केली, तर काही रक्कम मुदत ठेवीमध्ये गुंतविली होती. सवईकर याच्या विविध प्रकारच्या कंपन्या असून अनेक कंपन्यांमध्ये तो संचालक पदावर कार्यरत आहे. 

दरम्यान, "ईडी'ने गुरुवारी सकाळी सवईकर त्याच्या पुणे, सांगली, रत्नागिरी व नागपूर या शहरांमधील कंपन्या व कार्यालयांवर एकाचवेळी छापे घातले. बॅंकेच्या फसवणूक प्रकरणाच्या तपासासाठी आवश्‍यक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. 

लेटर ऑफ क्रेडीटद्वारे (एलसी) फसवणूक 

बॅंकांद्वारे देण्यात येणाऱ्या "लेटर ऑफ क्रेडिट'द्वारे ही फसवणूक झाल्याचे "ईडी'ने स्पष्ट केले आहे. आमच्या ग्राहकाचा माल विकल्यानंतर तो तुमचे पैसे देईल आणि त्याने पैसे दिले नाहीत, तर ते पैसे आमची बॅंक देईल, अशी गॅरंटी एक बॅंक दुसऱ्या बॅंकेला देते त्यास "लेटर ऑफ क्रेडिट' (एलसी) असे म्हटले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud with Bank Of India of Rs 293 Cores in Pune