दीडशे जणांना कोट्यवधीचा गंडा 

दीडशे जणांना कोट्यवधीचा गंडा 

पुणे : कोकणात एक लाख रुपयांत एक एकर जागा देतो, असे सांगून पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील जवळपास दीडशे जणांचा कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्‍यातील करक, पाचळ, सौंदळ आणि येरडव येथे सीमाभिंत, वीज, पाण्याच्या व्यवस्थेसह आंबा, काजूच्या झाडांची लगवड केलेली एक एकर जागा अवघ्या एक लाख रुपयांमध्ये, अशी जाहिरात सिंहगड रस्त्यावरील "कोकणभूमी डेव्हलपर्स'ने 2012 केली होती. लगेच पैसे भरले तर खरेदीखत, जमिनीची मोजणी, सातबारा उतारा नावावर असेही सांगण्यात आले. 

या जाहिरातीला बळी पडून पुणे व कोल्हापूर येथील अनेकांनी जागा घेण्याची तयारी दर्शविली. त्यांना "साईट व्हिजीट' करून आणण्यात आली. त्यापैकी काहींनी दोन एकर, चार एकर, तर काहींनी दहा एकर जागेचे पैसे भरले. पैसे भरल्यानंतर शेतकऱ्यांबरोबर थेट व्यवहार करून देतो, असे त्यांना सांगण्यात आले. व्यवहारासाठी गेले, तर शेतकरी नाही आले, असे कारण देऊन व्यवहार पुढे ढकलण्याचा प्रकार दोन ते तीन वेळा करण्यात आला. त्यानंतर साठेखत करून देण्यात आले.

साठेखत करताना दाखविलेली जागा न देता, दुसऱ्याच जागेचे साठेखत करून देण्यात आले. त्यापैकी काही जणांना भूसंपादनात गेलेल्या जागेचे साठेखत करून देण्यात आले. पूर्ण पैसे भरूनही खरेदीखत किंवा पैसेही परत देत नसल्याने संबंधित नागरिकांनी विकसकाकडे पाठपुरावा सुरू केला. मात्र विकसकाने हात वर केले. फसवणूक झालेल्या या नागरिकांनी "सकाळ'कडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. 

कंपनीचे कार्यालय बंद 

"कोकण डेव्हलपर्स'चे मालक राहुल सदाशिव पवार यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांनतर या विकसक कंपनीचे काम श्‍यामा चंपालाल चोरडिया पाहतात. त्यांच्याशी 8888594937, 9404222421, 9765300973, 7720002962 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सिंहगड रस्त्यावरील कुदळे पाटील इस्टेट इमारतीतील त्यांच्या कार्यालयास भेट दिली असता, ते देखील बंद होते. 

दोन एकर जागेसाठी माझ्याकडून दोन लाख रुपये घेण्यात आले. अद्याप खरेदीखत करून दिले नाही. पैसे आणि जागाही दिली नाही. वारंवार पाठपुरावा करूनदेखील पैसे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. माझ्यासारख्या शंभर ते दीडशे जणांकडून अशा प्रकारे पैसे घेऊन कोकणभूमी डेव्हलपर्सने फसवणूक केली आहे. 

- सचिन कोरके, गुंतवणूकदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com