
पुणे : म्हाडाकडून स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दांपत्याने काही लोकांकडून पैसे उकळून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शंकर दिनकर कांबळे (वय ६५, रा. मंगळवार पेठ, जुना बाजार) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून पोलिसांनी रेखा ऊर्फ कलावती भगवान कांबळे आणि तिचा पती भगवान कांबळे (रा. न्यू म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा आणि तिच्या पतीने आपण म्हाडामध्ये कार्यरत असून, पुनर्वसनामधील घर स्वस्तात मिळवून देते, असे फिर्यादीला सांगितले.
त्यांना मोबाईलवर म्हाडाची घरे दाखवून विश्वास संपादन केला. घराच्या बुकिंगसाठी अगोदर १६ हजार रुपये द्यावे लागतील. घर मिळाल्यानंतर म्हाडामध्ये डिमांड ड्राफ्ट काढून पैसे भरावे लागतील. पैसे भरल्याशिवाय घराची चावी मिळत नाही, असे सांगून त्यांना न्यू म्हाडा कॉलनीतील घरे लांबूनच दाखवली. रेखा कांबळे हिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी १६ हजार रुपये दिले.
त्यानंतर काही महिने उलटून गेले. घराबाबत चौकशी केली असता रेखाने तुम्हाला घर मिळणार नाही. तसेच, स्वत: जिवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली. तसेच, पतीने गुंडामार्फत मारहाण करण्याची धमकी दिली. या दांपत्याने अशा प्रकारे आतापर्यंत २५ ते ३० नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.