Olx वर वस्तू विकताय? तर मग हे वाचाच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

ओएलएक्‍स, गुगल पे याद्वारे शहरातील नागरीकांची सातत्याने फसवणूक होण्याचे प्रकार घडत असल्याची सायबर पोलिसांची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करताना पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. 

पुणे : घरातील सोफा विकण्यासाठी ओएलएक्‍सवर जाहिरात केल्यानंतर ती खरेदीच्या बहाण्याने एका अनोळखी व्यक्तीने महिलेस गुगल पे ऍपवर माहिती भरण्यास सांगून तिच्या बँक खात्यातील तब्बल 98 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने लंपास केले. ही घटना मे महिन्यामध्ये घडली आहे. 

याप्रकरणी औंध परिसरातील एका 25 वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेस घरातील जुना सोफा विकायचा होता. त्यासाठी महिलेने ओएलएक्‍स या संकेतस्थळावर सोफ्याची जाहीरात केली. त्यानंतर ही जाहीरात पाहून एका अनोळखी व्यक्तीने महिलेस फोन केला.

सोफा खरेदी करायचे कारण सांगून त्याने महिलेस ऑनलाइन पैसे पाठवतो असे सांगितले. त्यानंतर महिलेस गुगल पे डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने महिलेस एक लिंक पाठवून त्यामध्ये काही माहिती भरण्यास सांगितली. दरम्यान, महिलेच्या बँक खात्यातील 98 हजार रुपयांची रक्कम अनोळखी व्यक्तींनी काढून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

ऑनलाईन फसवणुक करणाऱ्यांपासून अशी घेता येईल काळजी 
- अनोळखी व्यक्तींवर विश्‍वास ठेवू नका 
- बॅंक व ऑनलाईन व्यवहारासंबंधीची वैयक्तीक माहिती देऊ नका 
- कोणत्याही आमिषाला बळी पडू नका 
- अनोळखी व्यक्तींनी पाठविलेल्या लिंक, मेसेजला प्रतिसाद देऊ नका 
-  बॅंकेकडून पाठविला जाणारा "ओटीपी' क्रमांक कोणाला देऊ नका 
- ऑनलाईन खरेदी-विक्री व आर्थिक व्यवहाराच्या ऍपची सर्वंकष माहिती असल्यावरच वापर करा. 

ओएलएक्‍स, गुगल पे याद्वारे शहरातील नागरीकांची सातत्याने फसवणूक होण्याचे प्रकार घडत असल्याची सायबर पोलिसांची माहिती आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करताना पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud while Selling Sofa on OLX