
Crime News : नामांकित डॉक्टरची दोन कोटींची फसवणूक करणाऱ्यास अटक
पुणे : शहरातील एका नामांकित डॉक्टरला विमा पॉलिसी देण्याच्या बहाण्याने दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एकाला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या संदर्भात तक्रारदार यांनी फिर्याद दिल्यावरून पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अत्यंत क्लिष्ट गुन्ह्याच्या तपासात आरोपीने वापरलेले बँक अकाऊंट डिटेल्स, मोबाईल नंबर, व्हॉट्सअॅप क्रमांक संबंधित कंपन्यांकडून माहितीचे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीचा शोध घेण्यात आला.
शहवान पुत्र सलीम अहमद (रा. लक्ष्मीनगर, दिल्ली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आग्रा, उत्तर प्रदेश येथील सायबर पोलिस ठाण्याच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला पुणे सायबर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. न्यायालयाने त्याला १३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यात यापूर्वी संदीप कुमार पुत्र धर्मपाल (रा. लक्ष्मीनगर गार्डन, लोणी, गाझियाबाद), साहब खान पुत्र नसीर अली (रा. पिढौना, कासगंज) आणि तुआजिब खान पुत्र आकील अहमद (रा. विढौणा, कासगंज) या तिघांना अटक केली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले, वरिष्ठ निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.