'त्यांना' हवेत फक्त दोन कृत्रिम हात

Madat
Madat

मंचर (पुणे) : कृत्रिम हात मिळाल्यास किमान जेवण करता येईल, असा दिलासा डॉक्‍टरांनी दिला आहे. खरेच तसे घडल्यास माझ्या जीवनात प्रकाश निर्माण होईल. ही भावना आहे संजय मेदगे (रा. राजगुरुनगर, कान्हेवाडी-कडदे, ता. खेड) यांची.

येथील गेटवेल हॉस्पिटलमध्ये साधू वासवानी मिशन पुणे, ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था मंचर यांच्या वतीने रविवारी (ता. 17) मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) वाटप शिबिरानिमित्त अनेक दिव्यांग आले होते. ते सर्वजण नाश्‍ता करण्यात व्यस्त होते. पण, संजय मेदगे (रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांना दोन्ही हात नसल्यामुळे ते खिन्न नजरेने तेथे उभे होते. हा प्रकार मंचर रोटरी क्‍लबचे माजी अध्यक्ष अजय घुले यांच्या लक्षात आला. क्षणाचाही विलंब न लावता नाश्‍त्याची डिश घेऊन घुले यांनी मेदगे यांना नाश्‍ता भरविला. हे दृश्‍य पाहून उपस्थित दिव्यांग व त्यांच्या समवेत आलेल्या नातेवाइकांनाही गहिवरून आले.

विजेचा शॉक बसल्याने 2007 मध्ये मेदगे यांचे दोन्ही हात व डाव्या बाजूचा डोळा निकामी झाला आहे. दोन्ही कानांनी त्यांना ऐकायला येत नाही. विशेष म्हणजे, त्यांना कुणाचाही आधार नसून ते एकटेच घरी राहतात. दररोज कोणाकडून तरी त्यांना जेवण बनवून घ्यावे लागते, तसेच कुणीतरी जेवण भरवावे लागते.

याबाबत मेदगे म्हणाले, "मोजणीचे काम करीत होतो. अचानकपणे विजेच्या वाहिन्यांना स्पर्श झाल्याने बेशुद्ध पडलो. यानंतर शुद्ध आली ती दवाखान्यातच. दोन्ही हात खांद्यापासून कापले गेले होते. डाव्या बाजूचा डोळा निकामी झाला होता. दोन्ही कानांनी ऐकायला येत नव्हते. हे समजल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सर्व काही संपल्यागत झाले होते. आता तर फारच मोठे संकट उभे राहिले होते. काही दिवसांनी दवाखान्यातून सुटी झाल्यावर घरी आलो. परिस्थिती हलाखीची होती. निराशा घेरू पाहत होती. पण, उदरनिर्वाहासाठी काहीतरी करायचे, असे ठरविले. एका शेतकऱ्याकडे शेळ्यांचे कळप सांभाळण्याचे काम केले. त्याच्याच घरचे लोक मला जेवण भरवत होते.''


संजय गांधी निराधार योजनेतून सध्या मला 800 रुपये दरमहा मिळतात. शेजारी राहणारे लोक मला मदत करतात. गेली 17 वर्षे दररोज माझी जीवनाची लढाई सुरू आहे.
- संजय मेदगे

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com