रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचा मोफत डबा (विधायक)

रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचा मोफत डबा (विधायक)

बारामती : येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या दहा नातेवाइकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने दररोज दोन्ही वेळेचा जेवणाचा डबा मोफत दिला जातो. गेल्या सहा जानेवारीपासून म्हणजेच वर्षभरापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

सिल्व्हर ज्युबिली या शासकीय रुग्णालयात बारामती तालुक्‍यातून उपचारासाठी रुग्ण येतात. रुग्णांना अनेकदा जेवणाची गरज भासत नाही; कारण त्यांच्या अन्नाची गरज सलाइनद्वारे भागवली जाते. पण रुग्णाबरोबर आलेल्या नातेवाइकांचे जेवणासाठी हाल होतात. पैसे जवळ असूनही अनेकदा वेळेवर जेवण मिळू शकत नाही. अशा लोकांची सोय व्हावी, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने 6 जानेवारी 2018 पासून हा मोफत डब्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. 

रुग्णांच्या नातेवाइकांना देण्यात येणाऱ्या डब्यात सहा पोळ्या, भाजी व चटणी आदींचा समावेश असतो. डबा मोफत मिळत असल्याने रुग्णाच्या नातेवाइकांचा खर्च वाचतो, शिवाय जेवणासाठी त्यांना बाहेर जावे लागत नाही. बाहेरगावाहून दाखल रुग्णांच्या नातेवाइकांना याचा सर्वाधिक फायदा होतो. डबे पुरविण्याच्या अन्नपूर्णा योजनेस उद्या (ता. 6) एक वर्ष पूर्ण होत आहे. याबद्दल सोमवारी (ता. 7) अकरा वाजता सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

जनकल्याण समितीच्या वतीने मंगलनिधी योजना राबविली जाते. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस या निमित्ताने या निधीत जमा होणाऱ्या पैशातून वर्षभर असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजाला दिशा देणारे उपक्रम म्हणून याची दखल घेण्याजोगे हे काम आहे. अनेकदा अनावश्‍यक गोष्टींवर अफाट खर्च केला जातो. मात्र समाजातील उपेक्षित घटकांना मदतीचा हात देणारा हा महत्त्वाचा उपक्रम आहे. 

महिला रुग्णालयातही दोघांकडून सोय! 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उपक्रमातून प्रेरणा घेत बारामतीतील उद्योजक संदीप मेनसे व दिलीप पडळकर यांच्या सहकार्यातून एमआयडीसीतील महिला रुग्णालयातील दहा महिला रुग्णांना दररोज चपाती, भाजी, वरण-भात असे पौष्टिक भोजन असलेला दोन्ही वेळेचा डबा मोफत रुग्णालयात नेऊन दिला जातो. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम सातत्याने सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com