पिंपरी पालिकेवर ‘मोफत प्रवास’चे भवितव्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

राष्ट्रवादीची घोषणा हवेत विरण्याची शक्‍यता; आचारसंहितेची टांगती तलवार 

राष्ट्रवादीची घोषणा हवेत विरण्याची शक्‍यता; आचारसंहितेची टांगती तलवार 

पुणे - पीएमपीमध्ये १५५० बस खरेदी करण्यासाठी तसेच प्रवाशांना महिन्यातून एका सोमवारी मोफत बस प्रवास देण्यासाठी पुणे महापालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केला असला, तरी पिंपरी चिंचवड महापालिकेनेही ठराव मंजूर केल्याशिवाय त्याची अंमलबजावणी शक्‍य नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी गुरुवारी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता १२-१५ दिवसांत लागू होण्याची शक्‍यता असल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तत्परतेवर या ठरावांचे भवितव्य अवलंबून असेल, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा हवेतच विरण्याची शक्‍यता आहे. 

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात १५५० बस घेण्याचा निर्णय दोन्ही महापालिकांनी तत्त्वतः मंजूर केला आहे. पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीतही त्या बाबतचा निर्णय जाहीर झालेला आहे. परंतु, बस खरेदी करताना त्याचे आर्थिक दायित्त्व आणि दैनंदिन संचलनातील तूट भरून काढण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचीही मंजुरी लागणार आहे. दोन्ही शहरांतील नागरिकांना महिन्यातून एकदा मोफत बस प्रवास देण्यासाठीचाही ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. दोन्ही महापालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. बस खरेदीसाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारही आग्रही असल्याचे या पूर्वी सातत्याने निदर्शनास आले आहे. मात्र, दोन्ही ठराव मंजूर व्हावेत, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेत फारशा हालचाली सुरू झालेल्या नाहीत. या बाबत पीएमपीमध्ये विचारणा केली असता, ८०० बसची 

दोन्ही ठरावांची अंमलबजावणी शक्‍य 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आणि खासदार ॲड. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘‘पीएमपीकडून दोन्ही शहरांतील प्रवाशांना वाहतुकीची सुविधा दिली जाते. तसेच पीएमपी सक्षम करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सुरवातीपासून प्रयत्नशील आहे. पुणे महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेतही दोन्ही ठराव मंजूर व्हावेत, यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. तसेच पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशीही चर्चा करून या बाबत तातडीने मार्ग काढण्यात येईल. दोन्ही ठरावांची वेळेत अंमलबजावणी होऊ शकते.’’

अजित पवार लक्ष घालणार ? 
जकात बंद झाल्यामुळे नाक्‍यांच्या काही जागा बस उभ्या करण्यासाठी किंवा आगारांसाठी मिळाव्यात, अशी मागणी पीएमपीने दोन्ही महापालिकांकडे केली आहे. पुणे महापालिकेने जकात नाक्‍यांच्या चार जागा ३० वर्षांच्या मुदतीने पीएमपीला दिल्या आहेत. मात्र, पिंपरी चिंचवडने या बाबतचा ठराव दफ्तरी दाखल केला. त्यामुळे पिंपरीमधील जकात नाक्‍यांच्या रिकाम्या झालेल्या किमान चार जागा तरी पीएमपीला मिळाव्यात, यासाठी निर्माण झालेल्या तिढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार लक्ष घालणार का, याकडेही पीएमपी प्रशासनाचे लक्ष लागले आहे. 

Web Title: free journey future on pimpri municipal