पुणे : मांजरी रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी                  

कृष्णकांत कोबल
शनिवार, 1 डिसेंबर 2018

 पुणे (मांजरी) : महादेवनगर मांजरी रस्त्याच्या कामामध्ये सुविधा व नियोजनाचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे रस्ता परिसरात ठिकठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. कामगार, विद्यार्थी व शेतकऱ्यांना या कोंडीचा दररोजच मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

 पुणे (मांजरी) : महादेवनगर मांजरी रस्त्याच्या कामामध्ये सुविधा व नियोजनाचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे रस्ता परिसरात ठिकठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. कामगार, विद्यार्थी व शेतकऱ्यांना या कोंडीचा दररोजच मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

अण्णासाहेब मगर महाविद्यालय ते मांजरी रेल्वे फाकट या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हे काम सुरू असताना येथील जड वाहतूक बंद ठेवणे अपेक्षित आहे. तसेच सेवा रस्ते विकसित करणे गरजेचे होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या बाबींकडे दुर्लक्ष करून गेली वर्षभरापासून हे काम तसेच सुरू ठेवले आहे. 
यापूर्वी हे काम कमी वर्दळीच्या परिसरात सुरू असल्याने कमीअधिक प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला होता. मात्र, सध्या महादेवनगर येथे भर वस्तीत मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी रस्ता, जलवाहिनी व सांडपाणी वाहिनीचे काम एकाच वेळी धोकादायक पध्दतीने सुरू आहे.

ऐन वर्दळ व गर्दिच्या वेळी येथे चार यंत्राने काम सुरु आहे. त्यामुळे नियमित वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होऊन तासनतास कोंडी होत आहे. कामगार व विद्यार्थी यांना त्यामध्ये अडकून पडावे लागत आहे. काम सुरू असे पर्यंत या मार्गावर अवजड वाहनांना बंदी करावी, अशी मागणी नागरिकांनी वारंवार केली आहे. मात्र, त्याबाबत बांधकाम विभागाने गांभिर्याने घेतलेले नाही. त्यामुळे अवजड वाहने सर्रासपणे येथून धावत आहेत. अगोदरच कसरत करून प्रवास करावा लागत असलेल्या या रस्त्यावर अवजड वाहनांमुळे वारंवार वाहतूक खंडीत होऊन कोंडी होत आहे.

''वाहतूक कोंडीमुळे दररोजच येथे मोठा वेळ वाया जात आहे. या कोंडीमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांना धूर व धुळीचा त्रास सहन करावा लागते आहे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत येथून होणारी अवजड वाहतूक बंद करण्याची गरज आहे.''
- सुनील घुले, नागरिक

 

Web Title: Frequent traffic jam at manjari Road in pune