मोकळ्या हवेसाठी टेकड्यांना पसंती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

आंबेगाव - शहरातील वाढत्या प्रदूषणाने नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात खुला श्वास घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी शहराप्रमाणेच उपनगरात मोकळ्या हवेकरिता जीवनदायी ठरणाऱ्या टेकड्यांचे महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. नऱ्हे गावास जोडणाऱ्या महापालिकेतील निसर्गरम्य आंबेगाव खुर्द टेकडीस सध्या परिसरातील नागरिक फिरण्यासाठी पसंती देत आहेत.

आंबेगाव - शहरातील वाढत्या प्रदूषणाने नागरिकांना रोजच्या धकाधकीच्या जीवनात खुला श्वास घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे निरामय आरोग्यासाठी शहराप्रमाणेच उपनगरात मोकळ्या हवेकरिता जीवनदायी ठरणाऱ्या टेकड्यांचे महत्त्व आता अधोरेखित झाले आहे. नऱ्हे गावास जोडणाऱ्या महापालिकेतील निसर्गरम्य आंबेगाव खुर्द टेकडीस सध्या परिसरातील नागरिक फिरण्यासाठी पसंती देत आहेत.

दक्षिण उपनगरातील पुणे बंगळूर नवीन महामार्गालगत आंबेगाव खुर्द टेकडीवर रोज सकाळ-संध्याकाळ व्यायामासाठी व फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. पूर्वेकडून पश्‍चिमकडे पसरणाऱ्या या टेकडीवरील काही भाग खासगी मालकीचा, तर काही भाग वन विभागाखाली येतो.

पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्थांनी येथे वृक्षलागवड केली असून अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने नियमितपणे या वृक्षांना पाणी घालण्याचे काम करतात. टेकडीवर स्वयंसेवी संस्था व ग्रामपंचायतीच्या वतीने ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्‍या बसविण्यात आल्या आहेत. वन विभागातून येणारे मोर, ससे यासारख्या वनचर प्राण्यांसाठी पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. टेकडीवर ठिकठिकाणी बाकड्यांची व्यवस्था करून नागरिकांसाठी विश्रांतीची सोय करण्यात आली आहे.

उत्तरेला टेकडीच्या पायथ्याशी स्वामी नारायण मंदिर असून, मंदिराजवळ दुचाकी, चारचाकी वाहने लावून टेकडीवर चालत फिरण्यासाठी आसपासच्या परिसरातील तरुणांसह महिला, अबालवृद्धांची पहाटेपासून रिघ चालू असते. व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता मंदिराजवळ विविध आरोग्यदायी फळांचे रस घेऊन विक्रेते बसलेले दिसतात. टेकडीवर पर्यावरण संवर्धनाकामी होणाऱ्या कामात सिंहगड ट्रेकर्स व मॉर्निंग वॉकर्स ग्रुपमधील कार्यकर्त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो. पुण्यातील तळजाई टेकडीप्रमाणेच या टेकडीचे संवर्धन व्हावे, पक्ष्यांना खाद्य मिळेल अशी पर्यावरणपूरक झाडे लावावीत, तसेच वन विभागाने पर्यावरणाच्या दृष्टीने येथील टेकड्यांचा विकास करावा, अशी अपेक्षा येथे येणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली.

 टेकडीवरील पहाटेचे आल्हाददायक वातावरण आणि मोकळी हवा शरीर व मनाला तजेला देतो. सिंहगड ट्रेकर्स ग्रुपच्या कार्यकर्त्यांमार्फत नियमितपणे झाडांना पाणी देण्याचे काम केले जाते.
- संदीप खेडेकर, नागरिक, नऱ्हे आंबेगाव

आम्ही रोज ग्रुपसह सकाळी फिरण्यास येत असतो. व्यायामाबरोबर येथे शक्‍य ती विधायक कार्ये करण्याचा आमचा प्रयत्न असतो. वन विभागाने नागरिकांच्या हितासाठी टेकड्यांचा विकास केला पाहिजे.
- राजाभाऊ कोंडे, सिंहगड ट्रेकर्स ग्रुप

Web Title: Fresh Air Hill health