असेही एक कन्यादान... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

चिखली (पुणे) : मुलीचे लग्न ठरलेले असताना वडिलांचा अपघात होतो. त्यात त्यांना कायमचे अपंगत्व येते. कमावणारी व्यक्तीच अंथरुणावर खिळून पडते. घरातील सगळ्यांना मुलीचे लग्न कसे होणार, याची चिंता भेडसावते... हे समजताच त्यांच्या बालपणीचा मित्र धावून येतो. लग्नाची संपूर्ण जबाबदारी घेऊन मित्राच्या मुलीचे कन्यादान करतो व मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा घडवून मित्रप्रेमाची भेट देतो. व्हिलचेअरवर बसून मुलीचा थाटामाटात पार पडत असलेला लग्नसोहळा पाहात असताना वडिलांना आनंदाश्रू रोखता येत नाहीत. चिखलीतील सामाजिक कार्यकर्ते विकास साने आणि संतोष भालेराव या दोन मित्रांची ही कहानी. 

साने आणि भालेराव बालपणापासूनचे मित्र. भालेराव यांची मुलगी स्नेहल हिचा विवाह शुक्रवारी (ता. 2) श्रीगोंदा येथील अक्षय जगदाळे याच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला; परंतु त्यापूर्वी वाहनचालक असलेल्या भालेराव यांचा सहा महिन्यांपूर्वी अपघात झाला. त्यांत त्यांना अपंगत्व आले. कमावणाऱ्या व्यक्तीलाच अपंगत्व आल्याने घरात आर्थिक चणचण सुरू झाली. त्यातच मुलीचा विवाह ठरलेला. लग्न कसे पार पाडणार, याची समस्या भेडसावत होती. चिखलीतील टाळगाव मंदिरात साध्या पद्धतीने लग्न करण्याचे ठरले होते. 
मित्राच्या मुलीचा विवाह ठरलेला असताना तो मोठ्या आर्थिक अडचणीत आहे, हे समजताच साने त्यांच्या मदतीला धावून आले. स्नेहलच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी साने आणि त्यांची पत्नी सपना यांनी घेतली. त्यांनी स्वतःची मुलगी मानून स्नेहलचे कन्यादान केले. मंदिरात होणारा विवाह मोठ्या थाटामाटात मंगल कार्यालयात पार पडला. समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून साने यांनी भालेराव यांना मित्रप्रेमाची भेटी दिली. मुलीच्या लग्नाचा सोहळा पाहून भालेराव यांना आनंदाने गहिवरून आले. 

देवाच्या रूपाने मदत... 
याबाबत स्नेहलचे वडील संतोष भालेराव म्हणाले, ""विकास हे माझे बालपणापासूनचे मित्र. त्यांची वेळोवेळी मदत झाली. मात्र, मुलीचे लग्न ठरलेले असताना मोठ्या अडचणीत होतो. काहीच सुचत नव्हते; परंतु त्याच्या रूपाने देवच माझ्या मदतीला धावून आला.''

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: friends memorable help for daughter merrige