#FriendshipDay  मैत्री जिव्हाळ्याची, आपुलकीची अन्‌ शेअरिंगची

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

सध्या सोशल मीडियाच्या जगात वावरताना कुणाला ही मैत्री हरपलेली वाटते, तर कोणाला जुने मित्र याच माध्यमातून गवसल्याचा आनंद होतो...रविवारी असणाऱ्या फ्रेंडशिप दिनानिमित्त ‘सकाळ’ने तरुण-तरुणींशी संवाद साधून त्यांचे मैत्रीचे बंध जाणून घेतले. 

मयांक शाह - मी मध्य प्रदेशातून नोकरीनिमित्त पुण्यात आलो. त्याला बरीच वर्षे झाली आहेत. त्यामुळे शाळा असो महाविद्यालयांतील मित्र-मैत्रिणींपासून दूरच आहे. पण, आजही मित्र-मैत्रिणींशी जुळलेला धागा टिकून आहे तो सोशल मीडियामुळे. फेसबुक आणि व्हाट्‌सॲपवरील ग्रुपमुळे माझे मध्य प्रदेशमधील मित्र अजूनही संपर्कात आहेत. आम्ही एकमेकांशी दूर असलो तरी व्हॉट्‌सॲपने आम्हाला जोडून ठेवले आहे.

हृषिकेश घोडके - मला महाविद्यालय सोडून काही वर्षे झाली आहेत. सोशल मीडियावर मित्र-मैत्रिणी सापडतात. त्यांच्यासोबत बोलणेही होते. पण तिथे बोलण्यापेक्षा मला प्रत्यक्ष त्यांना भेटून मैत्रीचा बंध जपायला आवडतो. म्हणूनच कुठेतरी महाविद्यालय संपल्यानंतरही माझे फ्रेंड्‌स मला आजही भेटतात. महाविद्यालयाच्या कट्ट्यावर भेटून आम्ही जुन्या आठवणींना उजाळाही देतो आणि मनसोक्त गप्पाही मारतो.

पूनम देशपांडे - पूर्वी ऑर्कूट होते, तेव्हा शाळेचे मित्र-मैत्रिणी सापडायचे. पण ॲण्ड्रॉईड मोबाईल नव्हता. माझे पती रोशन हे माझ्यासोबत महाविद्यालयात होते. पण महाविद्यालय संपल्यानंतर आम्ही कधीच भेटलो नव्हतो. पण फेसबुकवर त्याची प्रोफाइल सापडली आणि आम्ही संपर्कात आलो. पुन्हा आमची मैत्री वाढली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्न झाल्यानंतरही आमच्यातील मैत्रीचा धागा कायम आहे. आम्ही पुन्हा भेटू शकलो ते सोशल मीडियामुळेच.

मीनल भोसले - मी सातारा सोडून पुण्यात येऊन तीन ते चार वर्षे झाली आहेत. पण अजूनही सोशल मीडियामुळे साताऱ्यातील मित्र-मैत्रिणींशी संपर्कात आहे. शाळेतील मित्र-मैत्रिणींशी माझा संवाद टिकून आहे. नात्याला पुन्हा गुंफण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजेत. मी माझ्या जुन्या फ्रेंडस्‌ंना सोशल मीडियावर शोधले आणि एक एक करून प्रत्येक जण सापडत गेला. सोशल मीडियाने आम्हा कित्येक मित्र-मैत्रिणींना एकत्र जोडून ठेवले आहे.

स्नेहल काकडे - लहानपणापासूनच विविध टप्प्यांवर अनेक मित्र-मैत्रिणी आपल्याला भेटत असतात. अनेकदा शाळा, कॉलेजमधले फ्रेंड्‌स दुरावले जातात. मग, संपर्क राहत नाही. पण सोशल मीडियाने लहानपणापासूनचे ते आतापर्यंतचे सगळेच मित्र-मैत्रिणी माझ्या संपर्कात आहेत. त्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. प्रत्यक्ष भेट होत नसली तरीही किमान या माध्यमातून मैत्री जपता येत आहे. 

Web Title: Friendship Day Speical