इथेनॉल वापराने इंधनात बचत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 जानेवारी 2019

पुणे - इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल वापरून वाहने चालविण्यास ‘एआरएआय’ने हिरवा कंदील दाखविल्याने इंधनात बचत होणार असून, हवेतील प्रदूषणाची पातळीही कमी होईल. वाहनाचे आरोग्यही यातून चांगले राहात असल्याचा निष्कर्ष ‘एआरएआय’च्या अभ्यासातून निघाला आहे.

पुणे - इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल वापरून वाहने चालविण्यास ‘एआरएआय’ने हिरवा कंदील दाखविल्याने इंधनात बचत होणार असून, हवेतील प्रदूषणाची पातळीही कमी होईल. वाहनाचे आरोग्यही यातून चांगले राहात असल्याचा निष्कर्ष ‘एआरएआय’च्या अभ्यासातून निघाला आहे.

‘एआरएआय’ने ‘ई २०’चा प्रकल्प हाती घेतला होता. २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के गॅसोलिन वापरून वाहनावर काय फरक पडतो, याची चाचणी या प्रकल्पांतर्गत करण्यात आली. याबाबत अधिक माहिती देताना ‘एआरएआय’चे वरिष्ठ उपसंचालक एम. आर. सराफ म्हणाले, ‘‘या प्रकल्पासाठी जुनी वाहने घेऊन त्यातील इंधनात २० टक्के इथेनॉल टाकण्यात आले. ही वाहने चाळीस हजार किलो मीटर चालविण्यात आली. घाटरस्ता, द्रुतगती मार्ग, महामार्ग, कच्चे रस्ते अशा वेगवेगळ्या रस्त्यांवर ‘ई २०’ वाहने चालविली. त्यातून इथेनॉल टाकण्यापूर्वी आणि नंतर वाहनाच्या चालविण्यात, त्याच्या प्रदूषणात काही फरक पडलाय का, याचा अभ्यास यात करण्यात आला. त्यातून असे आढळून आले की, चाळीस हजार किलोमीटर चालवूनही वाहनांची कार्यक्षमता कायम राहिली. उलट, वाहनातून होणाऱ्या प्रदूषणाची पातळी कमी झाली.’’

‘ई २०’ची रस्त्यांवर चाचणी सुरू असतानाच प्रयोगशाळांमध्येही याची चाचणी सुरू होती. त्यामध्ये २० टक्के इथेनॉलच्या संपर्कात आल्यानंतर वाहनांच्या सुट्या भागावर नेमका कोणता परिणाम होतो, याचा अभ्यास प्रयोगशाळेत करण्यात आला.

सुट्या भागांवर कोणताही परिणाम नाही
‘एआरएआय’चे उपसरव्यवस्थापक एम. ए. बावसे म्हणाले, ‘‘इंधनाच्या संपर्कात येणाऱ्या वाहनाच्या सुट्या भागांवर इथेनॉलमुळे काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यासाठी काही भाग २० टक्के इथेनॉल आणि गॅसोलिन असलेल्या इंधनात वेगवेगळ्या कालावधीसाठी बुडवून ठेवण्यात आले. त्यात प्लॅस्टिक १८ आठवडे ठेवण्यात आले. इथेनॉलमध्ये ठेवलेल्या वाहनाच्या भागावर कोणताही परिणाम झाला नव्हता, असा निष्कर्ष यातून निघाला.’

Web Title: Fuel Saving by Ethanol Use ARAI