पूरग्रस्तांसाठी सुरू केलेल्या 'मिशन 73'ला नेटीझन्सचा प्रचंड प्रतिसाद

गणेश बोरुडे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

- सांगली आणि कोल्हापूरच्या भीषण पूरपरिस्थिची सांगड भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनाशी घालून ७३ च्या पटीत मुख्यमंत्री सहायता निधीला रक्कम जमा करण्याची भावनिक गळ सोशल मिडीयावर घातली आहे.  

- तळेगावातील डाॅ.प्रवीण माने यांनी ही सुर्वात केली असुन, त्यांच्या #मिशन७३,व्हीजन ७३ ला राज्यभरातून नेटीझन्सचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.

तळेगाव : सांगली आणि कोल्हापूरच्या भीषण पूरपरिस्थिची सांगड भारताच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनाशी घालून ७३ च्या पटीत मुख्यमंत्री सहायता निधीला रक्कम जमा करण्याची भावनिक गळ सोशल मिडीयावर घातली आहे.  तळेगावातील डाॅ.प्रवीण माने यांनी ही सुर्वात केली असुन, त्यांच्या #मिशन७३,व्हीजन ७३ ला राज्यभरातून नेटीझन्सचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे.

 

 

 

 

 

 

पेशाने दंतवैद्य असलेल्या डाॅ.प्रवीण माने यांनी कोल्हापूर, सांगली परिसरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सोशल मिडीयावर सहज एक पोस्ट तयार करुन मदत जमा करण्याचे ठरवले. मात्र यासाठी लोकांच्या शाहनिशेला सामोरे जाताना होणारा त्रास लक्षात घेता, यासाठी वेगळे खाते उघडण्याऐवजी थेट मुख्यमंत्री सहायता निधिलाच मदत जमा करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री सहारा निधीचा बँक खाते क्रमांक शेअर केल्याने दानशूरांनी शंका न घेता, खातरजमा न करता ७३ च्या पटीत पैसे जमा करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता अवघ्या तीन चार दिवसांत डाॅ.माने यांची #मिशन७३,व्हीजन ७३ पोस्ट राज्यभर व्हाॅटसअॅप आणि फेसबुकवर व्हायरल झाली. माने यांना फोनवर फोन सुरु झाले. शेकडो जणांनी पैसे जमा केल्याचे स्क्रीन शाॅटही माने यांच्याशी शेअर केले.

विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, व्यावसायिक, नोकरदार, रिक्षाचालक, गृहनिर्माण सोसायटया आदींसह अनेकांनी पोस्ट शेअर करत हे मिशन फत्ते केले. तीन महीने २१ दिवस पाकिस्तानच्या छळास तोंड दिलेले भारतीय सैन्यातील शुर जवान चंदू चव्हाण यांच्यासह राज्यभरातील अनेकांनी स्वतः फोन करुन या मोहीमेचे कौतुक केले. ७३ व्या स्वातंत्र्यदिनी ७३ रूपये प्रति कुटुंब सदस्य पूरग्रस्त भावंडांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतनिधी म्हणून जमा करु शकतात. सदर मोहीमेतला व्याप आणि प्रतिसाद वाढतच असून, मुख्यमंत्री सहायता निधीत भर पडत चालली आहे.

''७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त डाॅ.माने यांनी सोशल मिडीयावर पूरग्रस्त भावंडांसाठी चालू केलेली ही मोहीम मला मनापासून भावली. माझ्या सहकारी मित्रांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन मी केले आहे.तसेच महाराष्ट्रातील सर्व सरकारी कर्मचारी व अधिकारी यांनी एक दिवसाचा पगार पूरग्रस्त भावंडांसाठी द्यावा असेही मी आवाहन करतो.शासनाने सरकारी कर्मचार्यांचे पगार कपात करून उध्वस्त झालेल्या सामन्य जनतेचे पुनर्वसन करावे.कारण अशा वेळी सरकार कडून सर्वतोपरी मदत होणे हा सामान्य जनतेचा हक्क आहे."
- चंदू चव्हाण (सैनिक अहमदनगर)

"कुण्या एका व्यक्तीने आपत्कालीन परिस्थितीत योगदान देण्याऐवजी सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी स्वचेने मदत करणे अधिक प्रभावी ठरेल.स्वातंत्र्यदिनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.निधी थेट मुख्यमंत्री सहारा निधीच्या खात्यात जमा होत असल्याने,आपली मदत निश्चितच गरजूंपर्यत पोहोचेल यात शंका नाही."
-डाॅ. प्रवीण माने (#मिशन७३,व्हीजन ७३ मोहीमेचे प्रवर्तक)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: full response to Mission 73 started for flood victim help