कित्ती कित्ती हे मासेच मासे 

pune
pune

पुणे : मासेच मासे. चक्क दीड हजार मासे. त्यांच्या त्या छोट्याशा जगात ते काचेच्या घरांमध्ये फिरत होते. कुणी मोठा, कुणी चिमुकला. संभाजी उद्यानातील "मत्स्यालया'त काल छोटे दोस्त त्यांना भेटायला आले होते. मासेही त्यांना पाहत होते. 

या मत्स्यालयात एका माशाच्या डोक्‍याला टेंगूळ होते. तिथले प्रमुख अभय कौलगुड म्हणाले, "याला टेंगळ्या मासा म्हणतात. इंग्रजीत फ्लॉवर हॉर्न.'' त्याच्या जवळच्या एका काचपेटीतला अरवाना फिश उंच उड्या मारून हवेत उडणारे कीटक पकडून खातो. अप-डाउन कॅटफिश भराभर उलटेसुलटे पोहताना दिसले. 

एका मुलाने विचारलं, "अभयकाका, मासे आजारी पडतात का?'' काकांनी उत्तर दिलं, "हो. तसं होऊ नये म्हणून पाणी नेहमी चांगल्या दर्जाचं ठेवावं लागतं. एखादा मासा आजारी पडलाच तर आम्ही त्याला वेगळ्या काचपेटीत ठेवतो. माशांच्या या दवाखान्यात त्याच्यावर उपचार करतो. औषध देतो.'' या मत्स्यालयात एके ठिकाणी आपल्या डोक्‍यावर मासे काचपेटीत पोहताना दिसतात. जणू काही आपण समुद्राच्या पोटात उभे आहोत आणि वर मासेच मासे आहेत असं तिथे जाणवतं. अभयकाका मुलांना सांगत होते, "आमचं मत्स्यालय 1 ऑगस्ट 1953 ला सुरू झालं. 23 काचपेट्यांमध्ये 40 प्रकारचे मासे आहेत. त्यांच्या जेवणाची वेळ ठरलेली आहे. आमच्याकडे वयाने सर्वात मोठा असलेला मासा 10 वर्षांचा आहे. त्याला इंग्रजीत जाएंट गौरामी म्हणून ओळखलं जातं.'' 

पावसाळी जंगलासारखं वातावरण असलेल्या काचपेटीत मासे मजेत पळापळ करताना पाहून मजा वाटली. काही काचपेट्यांमधील माशांना मंद उजेड लागतो म्हणून निळसर प्रकाश सोडलेला आहे. तिथे असं वाटतं, की जणू स्वप्नातल्या जगात मासे आणि आपण भेटत आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com