पाण्यासोबतची स्टंटबाजी अंगलट 

drown
drown

खेडमधील खरपुडी येथे मंगळवारी पुराच्या पाण्यात घुसलेला तरुण अद्याप बेपत्ता 

राजगुरुनगर (पुणे) : स्टंटबाजीचे खूळ डोक्‍यात घुसल्याने बेभान झालेला तरुण स्वतःचा मुलगा आणि जवळचे लोक काठावरून हाका मारून माघारी बोलावत असतानाही पुलावरून चाललेल्या पुराच्या पाण्यात घुसला आणि प्रवाहाच्या जबरदस्त रेट्याने वाहून गेल्याची घटना मंगळवारी (ता. 30) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खरपुडी (ता. खेड) येथे घडली होती. आज एनडीआरएफच्या जवानांनी दिवसभर शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. जवान रिकाम्या हातांनीच परत फिरले. आझाद नारायण गाडे (वय38, रा. खरपुडी खुर्द) असे या तरुणाचे नाव आहे. 

प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, चासकमान धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे भीमा नदीला आलेल्या पुराने खेड तालुक्‍यातील खरपुडी बुद्रूक व खरपुडी खुर्द या दोन गावांना जोडणारा नवीन पूल मंगळवारी पाण्याखाली गेला होता. आझाद गाडे हा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रात्रपाळीसाठी कामावर निघाला होता. त्यावेळी त्याच्या आसपासचे लहानथोर पूर पाहण्यास काठावर उभे होते. त्याचा मुलगा साहिलही त्याच्यामागे त्याठिकाणी आला होता. पुलावरून पुराचे पाणी असतानाही आझाद खरपुडी बुद्रुककडे जाण्यास निघाला होता. लोक त्याला परत बोलावत होते, पण कोणाचेही न ऐकता तो पुढे गेला. मात्र, वाहत्या पाण्यातून जाताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो लटपटू लागला. त्याचा मुलगा साहिल, "माझ्या पप्पांना वाचवा' अशी आर्त विनवणी करीत होता. प्रथमेश गाडे व काही तरुण त्याच्याबाजूने नदीकाठाने धावले, पण पाण्याच्या रेट्यापुढे सर्वच हतबल झाले. शेवटी 
तिसरीत शिकणाऱ्या साहिल याला डोळ्यांदेखत आपल्या वडिलांना पुरात वाहून जाताना पाहण्याच्या भीषण प्रसंगाला सामोरे जावे लागले. 

आज एनडीआरएफच्या जवानांनी 11 किलोमीटरच्या परिसरातील पाण्यात होड्यांमधून शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. संध्याकाळी हे पथक माघारी फिरले, अशी माहिती खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले पाटील यांनी दिली. दरम्यान आज आझादच्या घरी खरपुडी बुद्रूक गावातील महिला व ग्रामस्थांची सांत्वनासाठी रीघ लागली होती.  
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com