भेकराईनगर परिसरात पीएमपी बसथांब्यांची दुरवस्था

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

फुरसुंगी - बस प्रवाशांची मोठी संख्या असतानाही हडपसर-सासवड रस्त्यावरील भेकराईनगर परिसरात बसथांब्यांची संख्या अपुरी आहे. सध्या जे थांबे आहेत, त्यांचीही दुरवस्था झाली आहे.  

फुरसुंगी - बस प्रवाशांची मोठी संख्या असतानाही हडपसर-सासवड रस्त्यावरील भेकराईनगर परिसरात बसथांब्यांची संख्या अपुरी आहे. सध्या जे थांबे आहेत, त्यांचीही दुरवस्था झाली आहे.  

मोठ्या लोकसंख्येमुळे येथे बस प्रवाशांची संख्या मोठी आहे. पीएमपी प्रशासनाने सासवड रस्त्याच्या कडेला सुमारे दहा बसथांबे उभारले आहेत. सर्व थांब्यांची दुरवस्था झाली आहे. थांबे लहान असल्याने निम्म्यापेक्षा जास्त प्रवाशी रस्त्यावर पाऊस, उन्हातच थांबतात. थांब्यांवर बसच्या वेळापत्रकाचा फलक नावालाही शिल्लक नाही. भटकी जनावरे थांब्यांत बसून आराम करतात व प्रवाशी पाऊस, उन्हात थांबतात, असेही दृश्‍य काही ठिकाणी दिसत आहे. थांब्यांशेजारील दुकाने, हॉटेल्स, घरांचे ओटे यांचा आसरा प्रवाशांना घ्यावा लागतो. थांब्यांतील आसनांच्या फळ्या गायब झाल्या आहेत. काही थांब्यांच्या समोरच पावसाच्या पाण्याची गटारे साचली आहेत. त्याच्या व थांब्यात साचलेल्या कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करतच प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागते. वेगवेगळ्या प्रकारचा राडारोडाही थांब्यांच्या जवळपास टाकलेला आहे. पावसामुळे थांब्यांलगत मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती प्रवाशांच्या मनात असते. फुरसुंगी उड्डाण पुलाजवळील दोन्ही थांबे प्रशासनाने काही महिन्यांपूर्वीच काढले आहेत. मागणी करूनही येथे नवे थांबे उभारले नाहीत. 

याबाबत फुरसुंगीच्या सरपंच सुधा हरपळे, राहुल चोरघडे म्हणाले, की बस थांबते म्हणूनच याला थांबे म्हणावे लागतात; अन्यथा येथे सुविधा नावालाही नाहीत. बसायची सोय नसल्याने बराच वेळ उभे राहून कंबरदुखी, पायात गोळे येणे, उन्हामुळे चक्कर येणे असे त्रास प्रवाशांना होतात. थांबे छोटे असल्याने लहान मुले, महिलांना पावसातच थांबावे लागते. पीएमपी प्रशासन शहरातील बसथांब्यांना सुविधा देते, तशा सुविधा ग्रामीण भागात देत नाही. प्रशासनाकडे सुविधांसाठी अनेकदा मागणी केली. काहीच उपयोग होत नाही. 

Web Title: fursungi pune news pmp bus stop condition in bhekrainagar