तरुणांना भविष्यात मोठ्या संधी - गणेश नटराजन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मार्च 2017

पुणे - 'भारत हा तरुणांचा देश आहे. त्यामुळे भविष्यातील संधी मोठ्या आहेत. उत्पादन, शेती, तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे नेहमी काही तरी शिकत राहा. यातूनच तुमचे जीवन समृद्ध होईल,'' असा संदेश नॅसकॉम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पुणे - 'भारत हा तरुणांचा देश आहे. त्यामुळे भविष्यातील संधी मोठ्या आहेत. उत्पादन, शेती, तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे नेहमी काही तरी शिकत राहा. यातूनच तुमचे जीवन समृद्ध होईल,'' असा संदेश नॅसकॉम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शासकीय तंत्रनिकेतनच्या 19 व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन, विभागीय सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार, डॉ. एम. आर. चितलांगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक नैपुण्य मिळविणाऱ्या सात विद्यार्थ्यांना सुवर्णपदक आणि 760 जणांना पदविका प्रदान करण्यात आल्या.

डॉ. नटराजन म्हणाले, 'ऐंशीच्या दशकात मी पदवी घेतली, त्या वेळी भारत सर्वच क्षेत्रांत झगडत होता. देश सर्व क्षेत्रांत मागे असल्याची चिंता व्यक्त केली जात होती. आता देश प्रत्येक क्षेत्रात जोमाने प्रगती करत आहे. देशातील 40 टक्के लोकसंख्या तरुण आहे. चौथी औद्योगिक क्रांती येऊ घातली आहे. शेती, तंत्रज्ञानासह सर्वच क्षेत्रांत प्रगती होत आहे. त्यामुळे भविष्यात तरुणांना खूप संधी आहेत.''

'देशात डिजिटल क्रांतीदेखील होत आहे. शेतकरीही बाजारभावाच्या माहितीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. वयोवृद्ध नागरिक तंत्रस्नेही होत आहेत. तरुणांनीदेखील त्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करावा. याचा भविष्यात निश्‍चित फायदा आहे. तुमच्या हातातील मोबाईलमध्ये जग सामावलेले आहे. यामुळे भविष्यात शिक्षणासाठी औपचारिक संस्थांमध्ये जाण्याचीही गरज राहणार नाही. शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर क्षमतेनुसार समाजासाठी काय करता येईल, याचा विचार करा. घेतलेले ज्ञान इतरांना द्या,'' असे आवाहन डॉ. नटराजन यांनी केले.

Web Title: future big chance for youth