गाडीखान्याला मिळाले जीवनदान

Gadikhana
Gadikhana

पुणे - महापालिकेचे डॉ. कोटणीस रुग्णालय (गाडीखाना) पाडून नवी इमारत बांधण्याचा प्रस्ताव प्रशासनाने गुंडाळण्याची भूमिका शुक्रवारी घेतली. त्यामुळे हे रुग्णालय पाडले जाणार नसल्याने त्यावर होणारा २५ कोटी रुपयांचा खर्च वाचणार आहे. या रुग्णालयाच्या इमारतीला धोका नसतानाही ती पाडण्यात येणार असल्याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते.

शुक्रवार पेठेतील ३५ गुंठे जागेत १९७१ मध्ये बांधलेली डॉ. कोटणीस रुग्णालयाची इमारत पाडून त्याजागी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची योजना भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे यांनी मांडली आहे. त्यासाठी खासगी वास्तुविशारद नेमून नव्या इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला. त्याचे सादरीकरण महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासमोर झाले. त्यानंतर यासंदर्भातील प्रस्तावाला गती देण्याच्या हालचाली वाढल्या. 

प्रत्यक्षात या रुग्णालयाच्या इमारतीला आता ४८ वर्षे झाली, पुढील १२ ते २२ वर्ष तिला कोणताही धोका नसल्याचे पालिकेच्या भवन विभागाचे म्हणणे आहे.

तरीही इमारत पाडण्याच्या दिशेने पावले उचलण्यात येत होती. अखेर प्रशासनाने रुग्णालय पाडण्याची कार्यवाही थांबवत आराखड्यांच्या प्रस्तावाची फाइल बंद केली आहे. या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणार नसल्याचे कारण देत, प्रशासनाने नवी इमारत उभारण्यास नकार दिला आहे. 

याविषयी भवन विभागाचे प्रमुख शिवाजी लंके म्हणाले, ‘‘रुग्णालयाची इमारत पाडण्यासाठी महापालिका स्तरावरील हालचाली थांबविण्यात आल्या आहेत. मुळात, त्यासंदर्भातील प्रस्तावावर प्रशासनाने कोणतेही पाऊल उचललेले नाही.’’

भाजप नगरसेवकांचाच विरोध 
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १८ मधील आरती कोंढरे यांचे सहयोगी नगरसेवक अजय खेडेकर आणि सम्राट थोरात यांनी नव्या इमारतीच्या कामाला निधी देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. डॉ. कोटणीस रुग्णालयाच्या दुरस्तीसाठी निधी आहे, त्यानुसार कामे केली जातील. मात्र, इमारत पाडून नवीन बांधण्याचा आमचा आग्रह नाही, असे खेडेकर आणि थोरात यांनी ‘सकाळ’ला सांगितले. या योजनेला भाजपच्या नगरसेवकांचा विरोध असल्याने ती अमलात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com