गदिमांचे स्मारक कागदावरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली, स्मारकासाठी जागा मिळाली, निधी उपलब्ध झाला; तरी महापालिकेतील प्रशासकीय कूर्मगतीमुळे गदिमांचे स्मारक रखडले आहे.

पुणे - ‘गीत रामायण’ने अजरामर झालेले ग. दि. माडगूळकर यांची जन्मशताब्दी संपत आली, तरी त्यांचे स्मारक उभारण्याचा महापालिकेचा मनसुबा हवेतच विरला आहे. सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली, स्मारकासाठी जागा मिळाली, निधी उपलब्ध झाला; तरी महापालिकेतील प्रशासकीय कूर्मगतीमुळे गदिमांचे स्मारक रखडले आहे.

गदिमांचे स्मारक उभारण्याची चर्चा गेल्या ४२ वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी माडगूळकर कुटुंबीयांनीही अनेकदा महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. महापौर मुक्ता टिळक, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांच्या सोबत माडगूळकर कुटुंबीय शहरात फिरले. अखेर कोथरूडमधील महात्मा सोसायटीजवळील सर्व्हे क्रमांक ६९-७० हा सुमारे १० एकराचा भूखंड स्मारकासाठी निश्‍चित झाला. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही त्यासाठी मंजुरी दिली. स्मार्ट सिटी कंपनीनेही त्यासाठी फेब्रुवारीमध्ये सहकार्य करण्याची घोषणा केली. गदिमांच्या शताब्दीला सुरवात होताना कोथरूडमध्ये झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी, स्मारकासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात येईल, असे जाहीर केले होते. परंतु, पुढे काहीच हालचाल झाली नाही. स्मारकासाठी निवड झालेल्या भूखंडांवर ‘एक्‍झिबिशन सेंटर’चे आरक्षण आहे. त्यातील काही जागा गदिमा स्मारकासाठी मंजूर करण्यात आली आहे. स्मारक कसे असावे, याचा आराखडा माडगूळकर कुटुंबीयांनी महापालिकेला सादर केला. परंतु, महापालिकेने तो अद्याप निश्‍चित केलेला नाही. त्यामुळे स्मारकाची फाईल पुढे गेलेली नाही. स्मारकाबाबत महापालिकेकडे किती वेळा पाठपुरावा करायचा? पालिकेचे उंबरे किती झिजवायचे? खुद्द महापौरांनी लक्ष घालूनही प्रशासन ढिम्म आहे, अशी भावना माडगूळकर कुटुंबीयांनी व्यक्त केली.

राज्य सरकार गदिमा-पु.ल.-फडके शताब्दी साजरी करीत असताना पुणे महापालिका मात्र गदिमा स्मारकाच्या बाबतीत बेफिकिरी दाखवीत आहे. स्मारक होत नसल्याने गेली ४२ वर्षे होत असलेला अन्याय आता महापालिकेने दूर करावा व शताब्दी संपायच्या आत भूमिपूजन करावे.
- सुमित्र माडगूळकर, गदिमांचे नातू

निवडणुकीनंतर भूमिपूजन
याबाबत महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ‘‘गदिमांच्या स्मारकाबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष झालेले नाही. त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. माडगूळकर कुटुंबीयांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा निश्‍चित करू. विधानसभा निवडणुका झाल्यावर स्मारकाचे भूमिपूजन नक्की होईल.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadima memorial

टॅग्स