गदिमांची गीते अजरामर - राम नाईक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

‘जिंकू किंवा मरू’ या गाण्याने आजही लहान-मोठ्यांना स्फुरण चढते; तर लहानग्यांमधील ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी’चे हे कौतुक कायम आहे. गीतरामायणाची भुरळ केवळ राज्यच नाही; तर देश आणि परदेशातील रसिकांनाही पडलेली आहे. सगळ्या वयोगटांतल्या माणसांसाठी गदिमांनी दिलेली ही देणगी अलौकिक आहे. त्यामुळे जोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहील, तोपर्यंत गदिमा अजरामर राहतील,’’ असा विश्वास माजी राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्‍त केला. तसेच ग. दि. माडगूळकर यांच्या असंख्य आठवणींना उजाळा दिला.

पुणे - ‘जिंकू किंवा मरू’ या गाण्याने आजही लहान-मोठ्यांना स्फुरण चढते; तर लहानग्यांमधील ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी’चे हे कौतुक कायम आहे. गीतरामायणाची भुरळ केवळ राज्यच नाही; तर देश आणि परदेशातील रसिकांनाही पडलेली आहे. सगळ्या वयोगटांतल्या माणसांसाठी गदिमांनी दिलेली ही देणगी अलौकिक आहे. त्यामुळे जोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहील, तोपर्यंत गदिमा अजरामर राहतील,’’ असा विश्वास माजी राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्‍त केला. तसेच ग. दि. माडगूळकर यांच्या असंख्य आठवणींना उजाळा दिला.

माडगूळकर परिवारातर्फे आयोजित केलेल्या गदिमा जन्मशताब्दी वर्षाच्या समारोपाच्या कार्यक्रमात नाईक बोलत होते. या वेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, लेखक प्रवीण दवणे, आनंद माडगूळकर, प्रकाश भोंडे उपस्थित होते. नाईक यांनी त्यांच्या आणि गदिमांच्या आठवणींना उजाळा दिला. गदिमांचे विविध पैलू उलगडले. 

केंद्र सरकारमध्ये मी जी काही महत्त्वाची पदे भूषविली त्यापाठीमागे गदिमांचे आशीर्वाद आहेत. ते आमदार झाल्यानंतर मला म्हणाले होते, ‘आमदार झालो तू नामदार होशील’ त्यानंतर काही वर्षांत मला मंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाली. मी आणि बाबूजी आम्ही दोघेही संघाचे काम करत असल्याने आम्हाला गदिमा जातवाले, असे म्हणायचे. मी माझ्या कॉलेजची दोन वर्षे गदिमांच्या घरी त्यांच्या सहवासात घालवली, हे माझे भाग्य आहे, अशा अनेक आठवणींना नाईक यांनी उजाळा दिला.   

बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, ‘गदिमा साहित्याचे सर्वप्रकार सहजतेने हाताळणारा मराठीतील एकमेव लेखक आहे. गदिमांनी लिहावे आणि सुधीर फडके यांनी संगीत देऊन गावे, असे अजूनही वाटत राहते. ‘त्या तिथे पलीकडे तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे,’ असे म्हणत आपल्या प्रेयसीचा पत्ता सांगण्याचे काम केवळ गदिमाच करू शकतात. गदिमांसारखी प्रतिभा ही क्‍लास लावून मिळणारी नाही. ती आतून यावी लागते. सध्या मला मराठी भाषेची भीती वाटते. मराठी इतकी गरीब का व्हावी, असा प्रश्न पडत राहतो. अशा काळात गदिमांचे साहित्य मराठीला पुन्हा एकदा नवसंजीवनी देणारे आहे.’ अरुण नूलकर यांनी सूत्रसंचालन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gadima song ram naik