आता हळहळ नको; चळवळ उभारू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

पुणे - नाट्य कलेवर आघात होतात, तेव्हा कलाकार मंडळी "फेसबुक', "ट्‌विटर', "व्हॉट्‌सऍप' यावर व्यक्त होतातच; पण हे पुरेसे नाही. हळहळ व्यक्त करण्याची वेळ संपली आहे. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना व्हावी, यासाठी एकत्र येऊन आता आपण चळवळ उभारूया, असा निर्धार नाट्य कलावंतांनी केला. गडकरी पुतळा संरक्षण समिती स्थापण्याचा विचारही कलावंतांमध्ये सुरू आहे. 

पुणे - नाट्य कलेवर आघात होतात, तेव्हा कलाकार मंडळी "फेसबुक', "ट्‌विटर', "व्हॉट्‌सऍप' यावर व्यक्त होतातच; पण हे पुरेसे नाही. हळहळ व्यक्त करण्याची वेळ संपली आहे. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना व्हावी, यासाठी एकत्र येऊन आता आपण चळवळ उभारूया, असा निर्धार नाट्य कलावंतांनी केला. गडकरी पुतळा संरक्षण समिती स्थापण्याचा विचारही कलावंतांमध्ये सुरू आहे. 

गडकरींनी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा फोडण्यात आला; पण तो अद्याप बसवला गेला नसल्याने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आज कलाकारांची एकत्रित बैठक झाली. त्याला दिग्दर्शक अमोल पालेकर, नाटककार सतीश आळेकर, अभिनेते डॉ. मोहन आगाशे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, शरद पोंक्षे, पुष्कर श्रोत्री, पुरुषोत्तम बेर्डे, श्रीरंग गोडबोले, संध्या गोखले, शुभांगी दामले, विभावरी देशपांडे, स्मिता शेवाळे, हृषीकेश जोशी, संदीप खरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

आळेकर म्हणाले, ""इतिहास हा इतिहासच असतो. तो खरा किंवा खोटा नसतो. त्याकडे इतिहास म्हणूनच आपण पाहायला हवे. यात "हे खरे', "ते खोटे' असे आपल्याला ठरवता येत नसते, हे आधी समजून घ्यायला हवे. ते समजून न घेता गडकरींचा पुतळा फोडला गेला.'' 

पालेकर म्हणाले, ""कलेचा इतिहास पुसून टाकला जात आहे, तोही हिंसक मार्गाने. अशा घटनांचा निषेध व्हायलाच हवा.'' 

मोहन जोशी म्हणाले, ""गडकरींचा पुतळा गैरसमजातून फोडला गेला. तो दूर करणे हेही कलावंतांचे काम आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आपण त्या प्रवृत्तीला उत्तर देऊ.'' 

दोन महिन्यांत पुतळा बसेल 
कलाकारांनी एकत्र येऊन गडकरींचा पुतळा बनवला. तो संभाजी उद्यानात लावला जाणार होता; पण तेथे जमावबंदी असल्याने कलाकारांना परवानगी मिळाली नाही. या पार्श्‍वभूमीवर, कलाकारांच्या दोन वेगवेगळ्या शिष्टमंडळांनी पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला आणि पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली. या वेळी गडकरींचा पुतळा पुढील दोन महिन्यांत उद्यानात बसवला जाईल, असे आश्‍वासन कुमार यांनी दिले. त्यामुळे कलाकारांनी बनवलेला पुतळा पालिकेला देण्यात येईल, अशी माहिती शरद पोंक्षे यांनी दिली. 

कलाकारांचे संकल्प 
- प्रत्येक नाट्य प्रयोगाच्या सुरवातीला "पुतळा कधी बसवणार' हा सवाल उपस्थित करू 
- गडकरींच्या नाटकाची पुनर्ओळख करून देणारे सांगीतिक कार्यक्रम आयोजित करणार 
- विरोधकांबरोबरच सामान्य प्रेक्षकांसमोर "राजसंन्यास' नाटकाचे जाहीर अभिवाचन करू 
- छायाचित्रांतून नाटकाच्या तिकिटावर आणि जाहिरातीत गडकरींचे स्मरण करणार

Web Title: Gadkari statue issue