गायकवाड यांच्या खुनासाठी तीन लाखांची सुपारी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पुणे/फुरसुंगी - वडकी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या खुनासाठी तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. या गुन्ह्यात आणखी तीन आरोपींना अटक केल्यानंतर हा प्रकार समोर आला. 

पुणे/फुरसुंगी - वडकी येथे जमिनीच्या वादातून झालेल्या खुनासाठी तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. या गुन्ह्यात आणखी तीन आरोपींना अटक केल्यानंतर हा प्रकार समोर आला. 

गेल्या आठवड्यात वडकी येथे सकाळी साडेसात वाजता शिवाजी दामोदर गायकवाड यांचा धारदार शस्त्रांनी वार करून खून झाला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी माजी महाराष्ट्र केसरी दत्तात्रेय गायकवाड याच्यासह सहा जणांना अटक केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली असून, मेघराज विलास वहाळे (वय 23, रा. खाटपेवाडी, मुळशी), शंकर विजय भिलारे (वय 24, रा. हिंगणे होम कॉलनी ), दत्तात्रेय महादेव पाडाळे (वय 23, रा. म्हाळुंगे, खेड) अशी त्यांची नावे आहेत. आरोपी वहाळे हा खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता. तेव्हा त्याच्या गावातील पांडुरंग मराठे हा देखील कारागृहात होता. तो सध्या कारागृहात असून जामीन मिळालेला वहाळे हा त्याला भेटण्यासाठी न्यायालयात जात होता. चार पाच महिन्यांपूर्वी वहाळे, शंकर भिलारे आणि पाडाळे हे मराठे याला भेटण्यासाठी गेले होते. तेथे पप्पू ऊर्फ सुनील गायकवाड हा देखील आला होता. मराठेने या तिघांची गायकवाड याच्याशी ओळख करून दिली. शिवाजी गायकवाड यांचा खून केल्यानंतर तुम्हाला प्रत्येकी तीन लाख रुपये देतो, असे सांगितले होते, अशी माहिती वहाळे याने तपासात दिली आहे. 

आरोपींनी कट रचून शिवाजी गायकवाड यांचा खून केला. त्यानंतर ते पसार झाले होते. या तिघांना पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलवरील संभाषण आदी तपशिलाच्या आधारे अटक केली. मराठे याला या गुन्ह्यात अटक करून सर्व आरोपींकडे एकत्रित तपास करायचा आहे, हत्यारे जप्त करायची आहेत, त्यामुळे तिघांना पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. ती न्यायालयाने मान्य करीत त्यांना 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. 

Web Title: Gaikwad's murder case