माजी खासदार गजानन बाबर आता भाजपच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज प्रवेश
पिंपरी - राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्यांचा ओघ थांबत नाही, तोच आता शिवसेनेतील काही दिग्गजांनीही भाजपचे दार ठोठावले आहे.

मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज प्रवेश
पिंपरी - राष्ट्रवादीतून भाजपमध्ये येणाऱ्यांचा ओघ थांबत नाही, तोच आता शिवसेनेतील काही दिग्गजांनीही भाजपचे दार ठोठावले आहे.

लोकसभा निवडणुकीत बंडाचे निशाण फडकाविल्याने पक्षातून हकालपट्टी झालेले शिवसेनेतील ज्येष्ठ नेते, माजी खासदार गजानन बाबर हेसुद्धा आता भाजपच्या वाटेवर आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. 18) त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे मंगळवारी (ता. 17) समजले.

शिवसेनेच्या स्थापनेपासून तीनदा नगरसेवक, दोनदा आमदार आणि एकदा खासदार असलेले बाबर हे दोन वर्षांपासून विजनवासात आहेत. झाले गेले विसरून त्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश द्यावा म्हणून आजवर वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू होते. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मंत्री लीलाधर डाके यांनीही त्यासाठी होकार दिला होता. मावळचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मात्र बाबर यांच्या प्रवेशासाठी तीव्र नाराजी दर्शविली होती. उभे आयुष्य शिवसेनेत घालविलेले बाबर हे पुन्हा प्रवेशासाठी दोन वर्षे ताटकळत थांबले होते. अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी केला. राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बाबर यांच्या प्रवेशासाठी विशेष महत्त्वाची भूमिका बजावली.

शहरातील व्यापारी, हातगाडी व पथारीवाले, टेंपोचालक, लघुउद्योजक आदी विविध 40 संघटनांचे बाबर हे गेल्या अनेक वर्षांपासून पदाधिकारी आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्याने त्याचा फायदा भाजपला होईल, असे सांगण्यात आले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्‍यातील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून गेले दहा वर्षे त्यांचे कार्य आहे. भाजपची सातारा जिल्ह्याची जबाबदारी तसेच राज्य सहकारी संघाचे अध्यक्षपद बाबर यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्‍यता आहे.

Web Title: gajanan babar bjp way