पुणे : इंस्टाग्रामवरही बाप्पाचा उत्सव (व्हिडिओ)

ब्रिजमोहन पाटील
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

सध्याचा जमाना हा सोशल मीडियाच आहे. नवीन काही पाहण्यासाठी हाच एक पर्याय आहे. हाच धागा पकडून पुण्यातील सहा मित्रांनी इंस्टाग्रामवर पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव डिजिटल स्वरूपात समोर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पुणे : सध्याचा जमाना हा सोशल मीडियाच आहे. नवीन काही पाहण्यासाठी हाच एक पर्याय आहे. हाच धागा पकडून पुण्यातील सहा मित्रांनी इंस्टाग्रामवर पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव डिजिटल स्वरूपात समोर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बाप्पाच्या मूर्ती, देखावे, मिरवणुकीच्या छायाचित्रांबरोबरच एका मिनिटाच्या व्हिडिओतून मंडळांची माहितीही दिली जाईल.

राधेय सोनवणे, वैष्णवी माहुरकर, तेजस मोरे, तनिश सोनवणे, प्रथमेश कोसंधर, स्वप्नील पारेख यांनी "इंस्टाग्राम'वर "पुणे फूडफॅक्‍टरी' नावाने अकाउंट सुरू केले आहे. यावरून ते पुण्यातील खाद्यसंस्कृतीचा प्रचार प्रसार करतात; पण यंदा त्यावरून पुण्यातील गणेशोत्सव समोर आणणार आहेत. त्यासाठी खास #pffganpatiustav हे हॅशटॅग वापरणार असून, त्यावरून व्हिडिओ, छायाचित्रे इंस्टाग्रामवर अपलोड करणार आहेत.

राधेय सोनवणे म्हणाला, की पुण्यातील मानाचे पाच गणपती, त्याचप्रमाणे दगडूशेठ गणपती, मंडई गणपती, जिलब्या गणपती, नातूबाग, गरुड, राजाराम मंडळ यासह 16 मंडळांच्या गणपतींची माहिती इंस्टाग्रामवर नेटीझन्सला देणार आहोत. गणपतीची स्थापना कधी झाली, त्याचा इतिहास, सामाजिक उपक्रम, मिरवणूक याचे एका मिनिटाचे अनेक व्हिडिओ तयार केले आहेत, नव्यानेही व्हिडिओही तयार केले जातील. मूर्तींची आकर्षक छायाचित्रेही अकाउंटवर पाहायला मिळतील; तसेच गणेशोत्सवात लाइव्ह केले जाणार आहे, त्यास चांगला प्रतिसाद मिळेल.

पुण्यातील तरुणांना प्रमुख गणपती मंडळांची नावे माहिती आहेत; पण या गणेशोत्सवाचा, मंडळांचा इतिहास, त्यांचे समाजिक कार्य, मूर्तीची वैशिष्टे माहिती नसतात. इंस्टाग्रामवरील तरुणाईला हे माहिती करून देण्याचा हेतू आहे. आमच्या सहा जणांमध्ये दोघेजण छायाचित्रकार आहेत. त्यामुळे या उपक्रमासाठी फायदा होतो, असे सोनवणे यांने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganapati Utsav on Instagram in Pune