उरुळी कांचन येथे शेतकऱ्यांचे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन

जनार्दन दांडगे
सोमवार, 7 मे 2018

येत्या आठ दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यास माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मेमाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला.

उरुळी कांचन (पुणे) - पूर्व हवेलीमधील हिंगणगाव, अष्टापूर, प्रयागधाम या गावांमध्ये नवीन रोहित्र उभारणे किंवा रोहित्राची दुरुस्ती करण्यात महावितरणकडून होत असलेल्या गलथान कारभाराबाबत विचारणा करण्यासाठी या भागातील शेतकरी सोमवारी (ता. ७) महावितरणच्या उरुळी कांचन उपविभागात गेले होते. मात्र त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी सबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याने अष्टापूर गावचे सरपंच नितीन मेमाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. 

येत्या आठ दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लागल्यास माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मेमाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला.

मागील दोन महिन्यापूर्वी स्थानिक ग्रामपंचायतीने उरुळी कांचन उपविभागाचे तत्कालीन उपकार्यकारी अभियंता बी. व्ही. साब्दे यांच्या कामाबाबत आक्षेप घेवून त्यांच्या बदलीची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे केली होती. त्यानुसार वरीष्ठांनी त्यांची महावितरणच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात बदली करून घेतली असून त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार उरुळी कांचनचे शाखाधिकारी व्यंकट गिर यांच्याकडे दिला आहे.

संदीप जगताप, पंडित जगताप, राहुल कोतवाल, गोरख चौधरी, विलास जगताप, दत्तात्रेय जगताप, संजय चौधरी, तुकाराम बहिरट, विठ्ठल कोतवाल यांच्यासह हिंगणगाव, शिंदेवाडी, अष्टापूर, प्रयागधाम येथील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

हिंगणगाव व अष्टापूर या दोन्ही ठिकाणच्या दुरुस्तीसाठी रोहित्रे उपलब्ध करून दिली असून येत्या दोन दिवसांत त्यामार्फत वीजपुरवठा सुरु होईल व प्रयागधाम येथे नवीन रोहित्र उभारण्याचे कंत्राट घेतलेल्या एजन्सीला नोटीस बजावली आहे तसेच, रोहित्राची तातडीने उभारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत असे महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता आर. एस. बुंदेले यांनी सांगितले आहे. तर, वरिष्ठ कार्यालयात तातडीच्या बैठकीसाठी जावे लागल्याने मला सोमवारी सकाळी उपविभागीय कार्यालयात उपस्थित राहणे शक्य झाले नाही असे अतिरिरक्त उपकार्यकारी अभियंता व्यंकट गिर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Web Title: Gandhigiri movement of farmers in Uruli Kanchan