भाजपकडून पुणे जिल्हाध्यक्षपदासाठी नव्या चेहऱ्याची निवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी तळेगाव-दाभाडे नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते गणेश भेगडे यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीने मावळने भाजपा जिल्हाध्यक्षपदावर तब्बल पाचव्यांदा बाजी मारली.

शिक्रापूर : भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी तळेगाव-दाभाडे नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते गणेश भेगडे यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीने मावळने भाजपा जिल्हाध्यक्षपदावर तब्बल पाचव्यांदा बाजी मारली.

दरम्यान झालेली निवड ही पुनर्वसन मंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष शिफारशीने झाल्याचे सर्वश्रुत असून या निमित्ताने बाळा भेगडे यांनी आपल्या मित्राला आणि पक्षाला एकाच वेळी न्याय दिल्याची भावना पक्षकार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. सदर निवडीची घोषणा भाजपा राज्य सरचिटणीस आमदार सुरेश हळवणकर यांनी केली.  

आज सकाळपासूनच पिंपरी-चिंचवडमधील आहेर गार्डन मंगल कार्यालयात भाजपाचे बैठक सुरू असून बाळा भेगडे मंत्रापदावर विराजमान झाल्यावर त्यांच्या पश्चात त्यांचे वारसदार कोण यावर बरीच चर्चा जिल्हाभर होत असताना आज अखेर जिल्हाध्यक्षपदाचा नारळ गणेश भेगडे यांच्या नावावर फुटला. दरम्यान भाजपाचे मावळमधील जिल्हाध्यक्ष म्हणून गणेश भेगडे हे पाचवे जिल्हाध्यक्ष ठरले असून या पूर्वी दिवंगत केशवराव वाडेकर, दिवंगत विश्वनाथ भेगडे (मंत्री बाळा भेगडे यांचे वडील), माजी आमदार दिगंबर भेगडे व विद्यमान मंत्री बाळा भेगडे. या शिवाय भाजपाच्या पूर्वीच्या जनसंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून कृष्णराव भेगडे यांच्या पासून हिंदूत्ववादी पक्षसंघटनेवर मावळने आपला प्रभाव कायम ठेवला असून जनसंघानंतर देशात अव्वल ठरलेल्या भाजपामध्येही पुन्हा मावळने आपल्या प्रभावाचा भगवा गणेश भेगडे यांच्या निमित्ताने फडकावला आहे.

दरम्यान बाळा भेगडे यांचे कट्टर समर्थक व भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते असलेले गणेश भेगडे, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस वासुदेव काळे, भाजपा जिल्हा संपर्कप्रमुख अ‍ॅड.धर्मेंद्र खांडरे, ’महानंद’चे संचालक दिलीप खैरे, हवेली भाजपाचे तालुकाध्यक्ष रोहीदास उंद्रे आदींमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी मोठी स्पर्धा होती. यात प्रामुख्याने मंत्री बाळा भेगडे, खासदार गिरीश बापट, आमदार बाबुराव पाचर्णे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चर्चेतून सदर निवड झाल्याची माहिती सांगण्यात येत असून या संपूर्ण प्रक्रीयेता सुरवातीपासून मंत्री बाळा भेगडेंनी गणेश भेगडेंसाठी पूर्ण ताकद वापरली असून आगामी मावळ विधानसभा मतदार संघातील निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच गणेश  भेगडे यांचा आग्रह बाळा भेगडेंकडून झाल्याची माहिती सांगण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh bhegde is BJPs new Pune District President