बिडकर-धंगेकर यांच्यात शाब्दिक चकमक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिकेच्या निवडणुकीतील माघारीनाट्यावरून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गणेश बिडकर आणि कॉंग्रेसचे पुरस्कृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयात मंगळवारी दुपारी जुंपली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे वातावरणातील तणाव निवळला. 

कसबा पेठ-सोमवार पेठ (क्र. 16) प्रभागातील कॉंग्रेसचे उमेदवार अस्लम बागवान माघार घेण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयात दुपारी एकच्या सुमारास आले होते. त्यांच्यासमवेत कॉंग्रेसने पुरस्कृत केलेले या प्रभागातील उमेदवार धंगेकरही उपस्थित होते. त्याच वेळी बिडकरही पक्षाच्या काही उमेदवारांच्या माघारीसाठी तेथे आले होते. तेव्हा बागवान उमेदवारी अर्ज मागे घेत असताना त्यावरून दोघांत शाब्दिक चकमक झाली. त्याचे पर्यवसान वादात झाले. त्यामुळे धंगेकर यांचे कार्यकर्ते गोळा झाले. ते समजताच बिडकर यांच्या कार्यकर्त्यांनीही क्षेत्रीय कार्यालयात धाव घेतली. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्की होऊ लागली. त्यामुळे कार्यालयात तणाव निर्माण झाला. काही कार्यकर्त्यांनी तेथील खुर्च्याही उचलून परस्परांवर फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून बंदोबस्त वाढविला अन्‌ दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर काढले. त्यानंतर काही वेळ निर्माण झालेला तणाव निवळला. महापालिका निवडणुकीसाठी धंगेकर यांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता. परंतु, बिडकर यांनी त्याला विरोध केला होता, तसेच जुन्या प्रभागातील काही कारणांवरूनही उभयातांमध्ये वाद आहेत. 

Web Title: ganesh bidkar-ravindar dhangekar