सोशल मीडियावरही ‘बाप्पा मोरया’

सोशल मीडियावरही ‘बाप्पा मोरया’

पुणे - घरातल्या गणपतीचे मनोहारी छायाचित्र अमेयने फेसबुकवर अपलोड केले अन्‌ त्यावर लाइक्‍सचा पाऊस पडला... शुक्रवारी घरोघरी बाप्पाचे मंगलमय वातावरणात स्वागत झाले. देखण्या सजावटीत बाप्पाला विराजमान करत भक्तांनी बाप्पाच्या आगमनाचा जल्लोष साजरा केला. हाच जोश सोशल नेटवर्किंग साइट्‌सवरही पाहायला मिळाला. फेसबुकपासून इंस्टाग्रामपर्यंत अनेकांनी आपल्या घरगुती बाप्पाचे छायाचित्र अपलोड करत नेटिझन्सना ‘ऑनलाइन बाप्पा’चे दर्शन घडविले. काहींनी सजावटीचे तर काहींनी गणरायाच्या आकर्षक मूर्तीचे छायाचित्र आणि व्हिडिओ शेअर केले. तर काहींनी बाप्पाच्या येण्याने घरातील मंगलमय वातावरणाचे चित्रण शब्दांमधून व्यक्त केले. सोशल साइट्‌सवर हा बाप्पामय जल्लोष सायंकाळपर्यंत टिकून होता.

गणरायाचे आगमन होताच अनेकांच्या उत्साहाला उधाण आले. घरगुती गणपतींसह मंडळांच्या गणपतीची छायाचित्रेही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात येत होती. पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींच्या आगमनाचा प्रत्येक क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून अनेकांनी शेअर केला. ढोल-ताशाचा गजर आणि घरातील गणपतीच्या येण्याने दाटलेला उत्साह अनेकांनी व्हिडिओतून फेसबुकवर शेअर केला. इंस्टाग्राम आणि व्हॉट्‌सॲपद्वारेही घरगुती गणपतीचे दर्शन नेटिझन्सना घडले. 

सकाळी आठ वाजल्यापासूनच सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर बाप्पाच्या आगमनाची छायाचित्रे अपलोड केली जात होती. पारंपरिक वेशभूषेत घरात झालेली आरती असो वा पंचपक्वान्नांचा नैवेद्य असा प्रत्येक क्षण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्‌सॲपद्वारे शेअर होत होता. काहींनी आपल्या घरातील बाप्पासोबत वा मंडळांच्या गणपतीसोबतची सेल्फी फेसबुकवर टाकली. तर काहींनी विविध संदेशाच्या माध्यमातून गणेशोत्सवातील आठवणींना उजाळा दिला. एकूणच सोशल नेटवर्किंग साइट्‌सचे जगही बाप्पामय झाले होते. आनंद, उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण प्रत्यक्ष जसे अनुभवता आले तसाच उत्साह सोशल मीडियावरही पाहायला मिळाला. 

बाप्पाच्या आगमनाचे फेसबुक लाइव्ह
अनेकांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले. हेच मंगलमय वातावरण आपल्या सोशल नेटवर्किंग साइट्‌सवरील मित्रांशी शेअर करण्यासाठी अनेकांनी फेसबुक लाइव्ह केले. घरातील गणपतीच्या सजावटीपासून नैवेद्यापर्यंत कित्येक क्षण त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून शेअर केले. तर मंडळाच्या गणपतीच्या आगमन आणि ढोल-ताशाच्या निनादाचे क्षणही फेसबुक लाइव्हद्वारे लोकांना पाहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com