बाप्पा झाले "महाग' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे - शाडू मातीच्या कमतरतेमुळे यंदा बाप्पांच्या मूर्ती महागल्या आहेत. सहा, नऊ इंचांपासूनच्या मूर्तीच्या किमती दोनशे, अडीचशे ते चारशे रुपयांपर्यंत आहेत. त्याहून अधिक उंचीच्या मूर्ती दहा हजारांच्या पुढे आहेत. 

पुणे - शाडू मातीच्या कमतरतेमुळे यंदा बाप्पांच्या मूर्ती महागल्या आहेत. सहा, नऊ इंचांपासूनच्या मूर्तीच्या किमती दोनशे, अडीचशे ते चारशे रुपयांपर्यंत आहेत. त्याहून अधिक उंचीच्या मूर्ती दहा हजारांच्या पुढे आहेत. 

विक्रेत्यांनी शहर व उपनगरांमध्ये गणेशमूर्तींचे स्टॉल, दुकाने थाटली आहेत. शाडू माती गुजरात (भावनगर), राजस्थान व मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागातून येते; परंतु मातीची मर्यादित उपलब्धता, घाऊक विक्रेत्यांकडून घ्यावी लागणारी माती आणि कारागिरांचे पगार व रंगरंगोटीसह अन्य खर्चाचा ताळमेळ बसविताना कारखानदारांनी मूर्तीच्या घडणावळीसाठी पाच ते दहा टक्के वाढ केली असल्याचे पेण येथील कारखानदार आनंद देवधर यांनी सांगितले. 

मानाच्या गणपती मंडळांच्या श्रींच्या मूर्तीची प्रतिकृती असलेल्या पूजेच्या मूर्तीही बाजारात आल्या आहेत. मात्र घरोघरी पूजेकरिता नऊ ते दीड फुटांपर्यंतच्या मूर्तीची मागणी नागरिकांकडून होते. 

नऊ ते दीड फुटांपर्यंतच्या शाडूच्या मूर्तींच्या किमती चारशे एकपासून हजार रुपयांपर्यंत आहेत. काही मध्यमवर्गीय नागरिक हजार रुपयांपर्यंतही आवडीने मूर्ती खरेदी करतात. मात्र सर्वसाधारणपणे सहा, नऊ, दहा व दीड फुटांपर्यंतच्या मूर्ती मध्यमवर्गीय घेत असल्याने त्यांना परवडतील, अशा किमती मूर्तीच्या आहेत. 
-विनय फाळके, विक्रेते 

शाडू माती वजनाला जड असून वाळायलाही वेळ लागतो. पण पर्यावरणाच्या दृष्टीने शाडू मातीच्या मूर्ती योग्य आहेत. तीन हजारांहून अधिक शाडूच्या मूर्ती आम्ही दरवर्षी विकतो. यंदा पहिल्यांदा नाव नोंदणी करणाऱ्या 51 जोडप्यांना ग्राहक पेठेतर्फे सारसबागेतील सिद्धिविनायकाच्या मूर्तीस अभिषेक करण्याची संधी आम्ही उत्सवादरम्यान देणार आहोत. 
-सूर्यकांत पाठक, कार्यकारी संचालक, ग्राहक पेठ 

Web Title: Ganesh idol expensive