गणेश मूर्ती विक्रेत्यांचा पिंपरीत बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

पीओपी मूर्तींसाठीचे भाडेही दीड हजार रुपयेच आकारावे, सहा महिन्यांपूर्वी नोटीस दिली असती किंवा जाहीर सूचना दिली असती तर आम्ही पीओपीच्या मूर्ती बुक केल्या नसत्या. त्यासाठी एका विक्रेत्याने किमान तीन लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे.

पिंपरी : गणेश मूर्ती विक्रीसाठी महापालिकेने शहरात स्टॉल उभारले. विक्रेत्यांना स्टॉलचे वाटपही केले. बुधवारी सकाळी विक्रेत्यांनी स्टॉलमध्ये मूर्ती आणून विकायला सुरवात केली. थोड्या वेळाने महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी आले. सर्वांना नोटीस दिली. स्टॉलचे भुईभाडे शाडू मूर्तीसाठी दीड हजार रूपये अधिक 18 टक्के जीएसटी आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींसाठी दहा हजार रुपये भाडे अधिक 18 टक्के जीएसटी भरायचा होता. त्यामुळे विक्रेत्यांनी स्टॉल बंद करून महापालिका भवन गाठून आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले.

पीओपी मूर्तींसाठीचे भाडेही दीड हजार रुपयेच आकारावे, सहा महिन्यांपूर्वी नोटीस दिली असती किंवा जाहीर सूचना दिली असती तर आम्ही पीओपीच्या मूर्ती बुक केल्या नसत्या. त्यासाठी एका विक्रेत्याने किमान तीन लाख रुपये गुंतवणूक केलेली आहे. या वर्षी दीड हजार रुपये भाडे आकारा, पुढच्या वर्षी पीओपींना परवानगीच देऊ नका, अशी भूमिका विक्रेत्यांनी मांडली. मात्र, दुपारी दोन वाजता स्थायी समितीची बैठक असल्याने आयुक्त हर्डीकर यांच्यासह अधिकारी बैठकीला निघून गेले. निर्णय न झाल्याने दरम्यानच्या काळात काही मूर्ती विक्रेत्यांनी महापालिका भवनाचे प्रवेशद्वार तर, काहींनी आयुक्त दालनासमोर ठिय्या मांडला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत तोडगा निघालेला नव्हता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh idol suppliers stay in pimpri