पूरग्रस्तांसाठी पुण्यातील गणेश मंडळांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी औषधे, अन्न, कपडे, शैक्षणिक साहित्यासह सर्व प्रकारची मदत करण्यासाठी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

पुणे -  कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांसाठी औषधे, अन्न, कपडे, शैक्षणिक साहित्यासह सर्व प्रकारची मदत करण्यासाठी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्या वस्तू जमा करण्याची, पूरग्रस्तांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी मंडळांनी स्वीकारली. काही मंडळांनी ‘सकाळ’कडे मदतीचा धनादेश दिला, तर काही मंडळांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन ‘सकाळ’तर्फे आयोजित गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत दिले.  

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’तर्फे शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांची शनिवारी ‘सकाळ’ कार्यालयात बैठक झाली. त्यामध्ये अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, ॲड. प्रताप परदेशी यांच्यासह सर्व प्रमुख गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी कोरेगाव पार्क येथील स्वराज्य गणेश मंडळाचे योगेश पिंगळे यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश दिला.

या बैठकीमध्ये कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यामध्ये काही मंडळांनी दहीहंडीच्या कार्यक्रमाचा खर्च टाळून ती रक्कम पूरग्रस्तांसाठी उपयोगात आणणार असल्याचे जाहीर केले, तर काही मंडळांनी येत्या दोन दिवसांत स्वतः जीवनावश्‍यक वस्तूंचा ट्रक घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीला जाण्याचे मान्य केले. काहींनी वेगवेगळ्या प्रकारची मदत करण्यासाठी चार गट तयार करून, त्यांच्यामार्फत पूरग्रस्तांना मदत पोचविण्याबाबत चर्चा केली. त्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. त्यानुसार शहरातील चार मंडळांवर अन्न, औषधे, कपडे व शैक्षणिक साहित्य अशी जबाबदारी सोपविण्यात आली. ज्या मंडळांना कपडे, धान्य, औषधे व शैक्षणिक साहित्य द्यायचे आहे, त्यांनी बैठकीमध्ये ठरल्यानुसार, चार मंडळांकडे मदत सोपवावी.  

दगडूशेठतर्फे दहा हजार कुटुंबांना मदत
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाच्यावतीने पूरग्रस्त दहा हजार कुटुंबांना मदत करण्याचे आश्‍वासन मंडळाचे महेश सूर्यवंशी यांनी दिले. त्याचबरोबर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्या मंडळांना वस्तू साठविण्यासाठी जागा किंवा अन्य प्रकारची मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Mandal initiative for flood victims