‘नदीसुधार’साठी मंडळांचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांचे रूपडे बदलण्यासाठी शहरातील मानाच्या गणपती मंडळांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे-  शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नद्यांचे रूपडे बदलण्यासाठी शहरातील मानाच्या गणपती मंडळांनी पुढाकार घेतला आहे. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प प्रशासनाने लवकरात लवकर हाती घ्यावा, असे आवाहन या मंडळांनी प्रशासनाला केले आहे. या प्रकल्पासाठी शहरातील सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेतील, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.  

खडकवासला ते खराडी या भागातील नदीपात्रामध्ये सुशोभीकरण तसेच वृक्ष लागवड करणे, शहरातील मैला आणि सांडपाणी नदीमध्ये जाणार नाही, यासाठी आवश्‍यक उपाययोजना करणे या गोष्टी प्रशासनाने नदीसुधार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये अंतर्भूत कराव्यात. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मंडळाकडून उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, पृथ्वीराज परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे विवेक खटावकर, नितीन पंडित, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, महेश सूर्यवंशी, अखिल मंडई मंडळाचे संजय मते आदी उपस्थित होते.  

शहरातील मानाच्या गणपतींनी चार वर्षांपूर्वी गणेश विसर्जन हौदात करण्याचा निर्णय घेतला. नदीचे प्रदूषण होऊ नये, यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे संपूर्ण राज्यातून स्वागत होऊन त्याला सकारात्मक पाठिंबा मिळाला, असे नमूद करत गेल्या काही वर्षांपासून ‘जायका’ मार्फत मुळा आणि मुठा या नद्यांसाठी नदी सुधार प्रकल्प साकारण्यात येणार आहे, असे सांगण्यात येते. मात्र, अद्यापही या प्रकल्पाबाबत प्रशासनाकडून कागदी घोडे नाचविले जात आहेत. प्रशासनाने त्वरित नदीसुधार प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी या वेळी मंडळांकडून करण्यात आली. तसेच यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापौर, आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार असून शहरातील सर्व नगरसेवकांनाही या प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणार असल्याचेही सूर्यवंशी यांनी नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Mandal initiative for river improvement